पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लैंगिक कल

 मागच्या सत्रात आपण पाहिलं की पुरुषांचे मानले गेलेले काही गुण स्त्रियांमध्ये दिसतात, स्त्रियांचे मानले गेलेले काही गुण पुरुषांमध्ये दिसतात. पुरुषी गुणधर्मात स्त्रीबद्दल लैंगिक आकर्षण वाटणं व स्त्रीच्या गुणधर्मात पुरुषांबद्दल लैंगिक आकर्षण वाटणं असं विभाजन केलं जातं. आपण हेही पाहिलं की संभोगात इन्सर्टिव्ह भूमिका हा 'पुरुषी' गुणधर्म मानला जातो व स्वीकृत भूमिका हा 'स्त्री' चा गुणधर्म मानला जातो. समाजानं असं विभाजन केलं असलं तरी निसर्गात मात्र या दोन्ही पैलूंबाबत वैविध्य दिसतं.

  वयात आल्यावर कोणत्या लिंगाच्या व्यक्तींबद्दल भावनिक व लैंगिक आकर्षण वाटतं तो आपला लैंगिक कल असतो. अनेक मुलांना लैंगिक व भावनिक आकर्षण फक्त मुलींबद्दल वाटतं, अनेक मुलींना लैंगिक व भावनिक आकर्षण फक्त मुलांबद्दल वाटतं. याचा अर्थ त्या मुला/मुलींचा लैंगिक व भावनिक आकर्षणाचा कल विरुद्ध लिंगाच्या व्यक्तींकडे असतो. अशा विरुद्ध लिंगाच्या व्यक्तींबद्दल लैंगिक व भावनिक आकर्षण असण्याला 'भिन्नलिंगी लैंगिक कल' म्हणतात.

  काही मुला/मुलींना दोन्ही लिंगाच्या व्यक्तीबद्दल लैंगिक व भावनिक आकर्षण वाटतं. या मुलांना मुलींबद्दलही लैंगिक व भावनिक आकर्षण वाटतं आणि मुलांबद्दलही. तसंच काही मुलींना मुलांबद्दलही लैंगिक व भावनिक आकर्षण वाटतं आणि मुलींबद्दलही. अशा लैंगिक व भावनिक आकर्षण असण्याला 'उभयलिंगी लैंगिक कल' म्हणतात. काही मुला/मुलींना फक्त त्यांच्याच लिंगाच्या व्यक्तींबद्दल लैंगिक व भावनिक आकर्षण वाटतं. अशा मुलांना फक्त मुलांबद्दलच लैंगिक व भावनिक आकर्षण वाटतं. तसंच अशा मुलींना फक्त मुलींबद्दलच लैंगिक व भावनिक आकर्षण वाटतं. याचा अर्थ या मुला/मुलींचा लैंगिक व भावनिक आकर्षणाचा कल त्यांच्याच लिंगाच्या व्यक्तींकडे आहे. असं लैंगिक आकर्षण असण्याला 'समलिंगी लैंगिक कल' म्हणतात. हे सर्व कल नैसर्गिक आहेत. हे तिन्हीं कल विविध प्राणी, पक्षी, माश्यांमध्येही आढळतात. सर्व जगात, सर्व प्रांतात काही पुरुषांमध्ये व काही स्त्रियांमध्ये उभयलैंगिकता, समलैंगिकता आढळते. या लैंगिक कलाच्या व्यक्ती नाहीत असा जगात कोणताही देश नाही. समलैंगिकतेचा विषय बहुतेक भारतीय लोकांना इतका अस्वस्थ करतो, की अगदी परवापर्यंत या विषयाबद्दल काहीही लिहिलं जातं नव्हतं. या विषयावरची वर्तमानपत्रात जरी बातमी आली तरी ती पाश्चात्त्य देशातील घडामोडींशी निगडित असायची. त्यामुळे समलैंगिकता पाश्चात्त्य संस्कृतीतून आली आहे असा लोकांचा

४६

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख