पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
समलैंगिकता





"लोक समलिंगी व्यक्तींचा एवढा द्वेष का हो करतात ?" मला हेल्पलाईनवर एका मुलाने विचारलं. त्याच्या आवाजात इतकी आर्तता होती की हेल्पलाईन चालवायला सरावलेला मीही एक-दोन सेकंद सुन्न झालो. कारण ती भावना मी अनेक वर्षं स्वतः अनुभवली होती. आता अभिमानानं समलिंगी म्हणणारा मी या यातनेतून गेलो होतो. आवाजात अंतर्भूत असलेली स्वीकाराची, तळमळीची हाक ऐकून माझ्यासमोर २० वर्षांपूर्वीची माझ्या तडफडीची आठवण झाली.

 हे योग्यच आहे, की या सत्राची सुरुवात माझ्याच अनुभवांनी व्हावी. मी पुण्यात एका मध्यमवर्गीय सनातनी कुटुंबात वाढलो. वयात आल्यावर मला पुरुषांबद्दल भावनिक व शारीरिक आकर्षण जाणवायला लागलं ( तेव्हा समलिंगी हा शब्द माहीत नव्हता.) इतर मित्रांसारखं मला स्त्रिया आवडत नाहीत, पुरुष आवडतात, या गोष्टीचा मला खूप त्रास झाला. मी या इच्छांना पाप समजायचो. साहजिकच याचा माझ्या स्वप्रतिमेवर, आकांक्षांवर परिणाम झाला. माझा आत्मविश्वास खचला, खूप नैराश्य आलं, आत्महत्या करावी असे विचार मनात येऊ लागले. एखादा बॉयफ्रेंड मिळवावा असं वाटू लागलं. पण ती इच्छा मनात येताच मी किती घाणेरडा आहे असा विचार मनात यायचा. पुढे स्त्रीशी लग्न झालं. ते टिकलं नाही.

  अमेरिकेत असताना ( मी कॉम्प्युटर सायन्सचा इंजिनिअर होतो व काही वर्ष अमेरिकेत नोकरीसाठी होतो) मी सॅन फ्रॅन्सिस्कोतील 'त्रिकोण' नावाच्या समलिंगी आधार संस्थेची मदत घेतली. मला त्या संस्थेत माझ्यासारखे अनेक भारतीय समलिंगी पुरुष भेटले व मी स्वतःला स्वीकारायला लागलो. माझ्या मनावरचं ओझं उतरलं. माझ्यामध्ये कमालीचा फरक पडला. पुढे मी कायमचा पुण्यात आलो. नोकरी सोडली व 'समपथिक ट्रस्ट' ही समलिंगी, ट्रान्सजेंडर व इंटरसेक्स व्यक्तींसाठी सप्टेंबर २००२ मध्ये संस्था सुरू केली. मी अग्निदिव्यातून गेल्यामुळे मला हे काम हाती घ्यायची प्रेरणा मिळाली.

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख

४५