पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जर नवीन परिस्थितीला सामोरं जायची मनाची तयारी झाली नसेल, तर शस्त्रक्रिया झाल्यावर नंतर आपण ही शस्त्रक्रिया करायला नको होती, असं जरी वाटलं तरी परत ही शस्त्रक्रिया उलटी करता येत नाही. अशा काही केसेस आहेत की ज्यांनी नीट माहिती न मिळवता, नीट विचार न करता लिंग / वृषण काढून टाकली आहेत व आता "माझा निर्णय चुकला आता मला परत लिंग व वृषण बसवा. जमेल का?" असं विचारायला माझ्याकडे आले आहेत. त्यामुळे या गोष्टी नीट विचारात घेणं, त्या व्यक्तीची मानसिक तयारी तपासणं खूप महत्त्वाचं असतं.

मानसोपचारतज्ज्ञ

 दोन संवेदनशील, पूर्वग्रहदूषित नसलेल्या मानसोपचारतज्ज्ञांना भेटून क्लायंट ट्रान्सजेंडर आहे असे दाखले मिळवावे लागतात. असे संवेदनशील मानसोपचारतज्ज्ञ मिळणं अवघड असतं. बहुतेकजण अत्यंत पूर्वग्रहदूषित असतात. मला एक ट्रान्सजेंडर म्हणाली, "मी मागची दोन वर्षं तिच्याकडे (मानसोपचारतज्ज्ञाकडे) जात होते. तिने दोन वर्षं माझा निर्णय कसा चुकीचा आहे हे समजून सांगण्यात घालवला." अशा डॉक्टरांचा काही उपयोग होत नाही. काही ट्रान्सजेंडर्स मात्र मानसोपचारतज्ज्ञांकडे जात नाहीत. गौरी मला म्हणाली, "मी एकाही मानसोपचारतज्ज्ञाकडे गेले नाही. मी एकाही मानसोपचारतज्ज्ञाला विचारलं नाही की मला दाखला दया. हे कोण मला दाखला देणार ? मला लहानपणापासून माहिती आहे की मी मुलगी आहे, बस! माझ्या शरीरावर माझा काही अधिकार आहे की नाही ?"

कायदा

 याच्यानंतर कायदयाच्या बाबी समजून घ्याव्या लागतात. एखादया व्यक्तीला जाणूनबुजून इजा करणं भा.दं.सं.३१९, ३२० या कलमांनुसार गुन्हा आहे. इजेचे विविध प्रकार दिले आहेत. यात पहिला प्रकार खच्चीकरणाचा (इमॅस्कूलेशन) आहे. खच्चीकरण म्हणजे एखादया पुरुषाचे वृषण काढून टाकणं. हा कायदा खूप पूर्वी बनवला होता जेव्हा ट्रान्सजेंडर, ट्रान्ससेक्शुअल व्यक्तींबद्दल काहीही शास्त्रीय माहिती नव्हती. आज ज्या पुरुषांना शस्त्रक्रिया करून स्त्री बनायचंय अशांना ही कलमं लागू होतात का? याचं उत्तर स्पष्ट नाही. ही शस्त्रक्रिया करण्याआधी काही डॉक्टर्स त्या व्यक्तीला अॅफिडेव्हीट करायला सांगतात. या अॅफिडेव्हीटमध्ये ती व्यक्ती सज्ञान आहे व ही शस्त्रक्रिया स्वतःच्या मर्जीनं करू इच्छिते हे नमूद केलं जातं. डॉक्टर जरी अॅफिडेव्हीट लिहून घ्यायची काळजी घेत असले तरी जोपर्यंत भा.दं.सं. ३१९, ३२० मध्ये बदल होत नाही



४०

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख