पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यात फरक आहे. हा फरक त्यांना समजायला खूप जड जात होतं.

  पूर्वतयारी

 सामाजिक बाबींवर चर्चा करावी लागते. या प्रवासात क्लायंटला आधार देणाऱ्यांची यादी बनवावी लागते. (उदा. मित्र, मैत्रिणी, नातेवाईक). त्यांना बोलावून त्यांना सर्व गोष्टी समजावून सांगाव्या लागतात. त्यांच्या ज्या काही शंका असतील त्यांचं निरसन करावं लागतं.

  काहीजण माझ्याकडे येतात आणि म्हणतात, की "मला लिंग बदलायची शस्त्रक्रिया करायची आहे.” त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगितलेलं नसतं. सहकाऱ्यांना मित्रांना माहिती नसतं. "घरच्यांना कल्पना आहे का?", "या प्रक्रियेत त्यांचा आधार घेणार का?" असं मी विचारलं तर म्हणतात, की “शस्त्रक्रिया झाल्यावर आम्ही घरच्यांना सांगणार. आत्ताच हे बोलणार नाही कारण त्यांचा खूप विरोध होईल." जर तुम्ही प्रौढ असाल, घरच्यांपासून वेगळे राहत असाल, आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल, तर हे पाऊल तुम्ही उचलू शकता. पण जर तुम्ही घरच्यांपासून वेगळे राहत नसाल, विविध कारणांसाठी घरच्यांवर अवलंबून असाल, तर अशा वेळी एवढी मोठी गोष्ट त्यांच्यापासून लपवून ठेवणं कितपत योग्य आहे याचा विचार होणं गरजेचं आहे. लिंग बदलायची प्रक्रिया सुरू झाली व मध्येच घरच्यांना कळलं, तर लिंगबदल प्रक्रियेचा ताण, त्यामुळे होणारे शारीरिक व मानसिक बदल व त्यात घरच्यांची भांडणं या सगळ्या त्रासांना एकदम सामोरं जावं लागतं. हे सगळेच त्रास एकाच वेळी आपल्याला झेपणार आहेत का ? याचा नीट विचार करावा लागतो. हा विचार अनेक वेळा झालेला दिसत नाही. काही वेळा आपल्या जोडीदाराचं लग्न ठरत असतं आणि ते ठरायच्या आत लिंगबदल करून त्याच्याशी / तिच्याशी गुपचूप लग्न लावायचं असतं. सर्व पैलूंचा नीट विचार न करता असं पाऊल उचलण्याचा उतावीळपणा करू नये.

  जर पुरुष शस्त्रक्रियेनंतर स्त्रीच्या वेशात राहणार असेल तर शस्त्रक्रियेआधी किमान एक वर्ष तरी त्यानं स्त्रीची जीवनशैली जगावी असं सुचवलं जातं. (जर तो अगोदरपासून स्त्री - वेशातच वावरत असेल तर हा मुद्दा उपस्थित होत नाही.) पुरुषाला समाजात जेवढं स्वातंत्र्य आहे तेवढं स्त्रियांना नाही. जर स्त्री म्हणून समाजात वावरायचं ठरवलं तर या मर्यादांची मानसिक तयारी व्हावी लागते. बदल झाल्यावर हे स्वातंत्र्य गृहीत धरता येणार नाही याची जाण हवी. एक ट्रान्ससेक्शुअल म्हणाली, "आता मी संध्याकाळी कोणत्याही पुरुषाशी रस्त्यात बोलताना दिसले

तरी वस्तीतील लोक माझ्याकडे संशयी नजरेनं बघतात. ही बाई कशी काय परपुरुषांशी बोलते ?”

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख

३०