पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तोपर्यंत तरी डॉक्टरांसाठी ही कायदेशीर बाजू नाजूकच असणार आहे.

 खच्चीकरण व 'SRS' या दोन्ही विषयांबद्दल अनेक प्रश्न कायदयाच्या दृष्टीनं आज तरी अनुत्तरित आहेत. यातील काही मुद्दे-

* खच्चीकरण झालेल्या पुरुषाला कोणत्या लिंगाचं मानायचं ? पुरुष ? का स्त्री ? का एक तिसरं सेक्स म्हणून कायदयाने मान्यता दयायची ? जर तिसरं सेक्स म्हणून कायदयाने मानलं तर त्यांचे अधिकार कोणते? तृतीयपंथी लोकांना इलेक्शन कमिशनने मतदार ओळखपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. यात 'पुरुष' किंवा 'स्त्री' यांच्याऐवजी 'इतर' हा लिंगाचा प्रकार वापरण्यात यावा असं सुचवलं आहे. पण कायदयाच्या इतर पैलूंमध्ये लिंगाचा प्रकार 'इतर' म्हणून चालणार का ?

  • 'SRS' करून पुरुषापासून स्त्री बनली किंवा स्त्रीपासून पुरुष बनला तर लग्न, घटस्फोट, वारसा हक्क, दत्तक घेणं या सर्वांसाठी कोणते कायदे लावणार ? पुरुषाचे का स्त्रीचे ? हे कायदे त्यांच्या बदललेल्या लिंगावर आधारित असणार की त्यांच्या जन्माच्या वेळेच्या लिंगावर आधारित असणार? उदा. वडिलांनी वारसा हक्क सगळा मुलांसाठीच ठेवला, त्यांची एक मुलगी 'SRS' करून पुरुष बनली तर त्याला मुलगा मानून वाटा मिळणार का ?


शस्त्रक्रिया

 एका कुशल सर्जनबरोबर व एन्डोक्रिनॉलॉजिस्टबरोबर लिंगबदल शस्त्रक्रियेच्या वैदयकीय पैलूंवर चर्चा केली जाते. लिंगबदलाचे टप्पे कोणकोणते असतात, कोणते पर्याय उपलब्ध आहेत? शस्त्रक्रिया / संप्रेरक थेरपीच्या मर्यादा, दुष्परिणाम काय आहेत हे क्लायंटला समजावलं जातं. खर्चाचं अंदाजपत्रक बनवलं जातं.

पुरुषाचं स्त्रीत रूपांतर (M to F: Male to Female)

पर्याय १ : काहीजण नुसती कृत्रिम स्तनं बसवतात (ब्रेस्ट इंप्लान्ट), आपल्याला पाहिजे त्या आकाराची सिलीकॉन पिशव्यांची स्तनं बसवली जातात. अशा व्यक्ती शरीरानं कंबरेवरती स्त्री व कंबरेखाली पुरुष राहतात (शी - मेल ).

पर्याय २ : काहीजण वृषण आणि लिंग काढून टाकायची शस्त्रक्रिया करतात. एक लघवी बाहरे यायचं छिद्र उरतं. शरीराच्या आतील वीर्यकोष काढून टाकत नाहीत. जर वीर्यकोष तसेच ठेवले तर काही अंशी विर्यनिर्मिती चालू राहते. वीर्यकोष भरले की त्यातून वीर्य वाहून या छिद्रातून गळतं. योनी तयार करून घेतली जात नाही.

पर्याय ३ : काहीजण वरील (पर्याय २) शस्त्रक्रियेबरोबर शरीराच्या आतील


मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख

४१