पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वप्रतिमेला एक आशेचा किरण दिसतो व तो म्हणजे आपण इतर पुरुषांसाठी लैंगिक उपभोग्य वस्तू बनून त्यांचा स्वीकार मिळवणं, आपलं 'बाईलपण' सिद्ध करणं. म्हणून मग इतर पुरुषांचं लक्ष जावं म्हणून सुंदर किंवा भडक दिसण्यावर भर पडते व समाजाच्या संगनमतानं लैंगिक उपभोग्य वस्तू म्हणून प्रतिमा बनते.

लिंगबदल शस्त्रक्रिया (SRS: Sex Reassignment Surgery )

 समाजाच्या दबावामुळे बहुतेक ट्रान्सजेंडर व्यक्ती आपला लिंगभाव लपून ठेवायचा प्रयत्न करतात. काहींना आपला लिंगभाव लपून ठेवणं अशक्य असतं. लिंगभाव दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा त्यांच्या स्वप्रतिमेवर विपरीत परिणाम होतो. जगणं अशक्य होतं. त्यांना तीव्र इच्छा असते की आपल्याला जी मानसिक घडण निसर्गानं दिली आहे तीच जगली पाहिजे, मग त्याचा समाजाकडून कितीही त्रास होवो. आपल्या लिंगभावाशी समरस शरीर असावं ही इच्छा तीव्र असते. म्हणून काहीजणं तसं शरीर घडवायचा मार्ग शोधायची खडतर तपश्चर्या करतात.

ट्रान्ससेक्शुअल्स

 जी ट्रान्सजेंडर व्यक्ती लिंगबदल शस्त्रक्रिया करून आपलं शारीरिक लिंग बदलते अशा बदल झालेल्या व्यक्तीला 'ट्रान्ससेक्शुअल' म्हणतात. या बदलाचे अनेक टप्पे आहेत, याची थोडक्यात ओळख खाली दिली आहे.

लिंग बदलायचे टप्पे

माहिती मिळवणं

 ज्या कॉन्सेलरला या विषयातलं ज्ञान आहे व जो पूर्वग्रहदूषित विचार करणारा- नाही अशा कॉन्सेलरला भेटावं लागतं. संवेदनशील कॉन्सेलर मिळणं अवघड असतं. कॉन्सेलरकडे जाऊन या विषयाची पूर्ण माहिती मिळवावी लागते. कॉन्सेलर विविध गोष्टी पडताळून बघतो. आलेली व्यक्ती ट्रान्सजेंडर आहे का ? का काही विशिष्ट 'मूड्स' असतानाच स्त्री बनायची इच्छा प्रकट होते? काही गैरसमजुतींतून, कुणाच्या दबावातून तर हा निर्णय घेतला जात नाही ना?

 ही व्यक्ती समलिंगी आहे पण गैरसमजानं ही व्यक्ती स्वतःला ट्रान्सजेंडर तर समजत नाही ना ? काहीवेळा चर्चेत दिसून येतं, की क्लायंटला हा विषय नीट कळलेलाच नसतो. एक ताई म्हणाल्या, “माझा मुलगा समलिंगी आहे. या समाजात त्याने दुसऱ्या मुलाबरोबर संसार करणं शक्य नाही; तर त्याची शस्त्रक्रिया करून बाई बनवता येईल का ?" इथे त्यांना मी बरंच समजवण्याचा प्रयत्न केला की लैंगिक कल व लिंगभाव


३८

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख