पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणून माझ्या अंगावर धावून आला. मला पाडलं व मला मारायला लागला. मी लाथा- -बुक्क्यांनी त्याचा प्रतिकार केला. म्हणाले मला असंच राहायचंय."

  असं वेगळंपण बघून घरच्यांना घाबरायला होतं. त्यांच्या मनात समाजाची भीती असते. या भीतीचं रूपांतर रागात होतं आणि मग मारहाण करणं, घरातून काढून टाकणं असे प्रकार सर्रास घडतात. काही पालक मुलाला मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन जातात. आमच्या पोराला ठीक करा' म्हणतात. अनेक मानसोपचारतज्ज्ञांना या विषयाची फारशी माहिती नसल्यामुळे ते अशा मुलांना बदलायचा प्रयत्न करतात. अर्थातच कोणत्याही प्रयत्नांनी मुलाचा लिंगभाव बदलत नाही

  मुलाचं बायकी वागणं बघून शाळा - कॉलेजमध्ये चेष्टा होऊ लागते. अनेकांना रॅगिंगला तोंड द्यावं लागतं. गौरी म्हणाली, (हा जन्माने मुलगा. लहानाचं मोठं होताना त्याला सातत्यानं आपण मुलगी आहोत असं वाटलं. पुढे मोठा झाल्यावर याने लिंगबदल शस्त्रक्रिया केली), “माझं सुदैवानं रॅगिंग झालेलं नाही. पण काही प्रमाणात मुलं त्रास दयायची. गणपत पाटील म्हणून चिडवणं, ढुंगणाला चिमटा काढ, बाथरूमला गेलो की बाहेरून कडी लाव असा त्रास मोठी मुलं दयायची. मला मुलींमध्ये सुरक्षित वाटायचं व त्याही आपणहून मला त्यांच्या खेळात सामील करून घ्यायच्या. माझ्यापासून त्यांना कधीही असुरक्षित वाटलं नाही." (समाज याचा बरोबर विरुद्ध व चुकीचा अर्थ काढतो, की गौरी लहान असताना मुलींमध्ये राहायचा म्हणून त्याचा लिंगभाव मुलीचा बनला.)

 अशा अनेक मुलांचं लैंगिक.शोषण होतं. माझ्यासमोर अशी अनेक उदाहरणं आली आहेत. इथेही समाज विरुद्ध व चुकीचा अर्थ काढतो, की त्या मुलाचं लैंगिक शोषण झालं म्हणून तो तसा' झाला.' समाज असा विचार करत नाही की जर तो मुलगा बुजरा असेल, नाजूक असेल, बायकी असेल, तर त्याचं लैंगिक शोषण होण्याची शक्यता जास्त असते.

  अशा वातावरणात वाढताना अनेकांना खूप नैराश्य येतं. विशेषत: ज्याच्या वेगळ्या लिंगभावाचे गुणधर्म समाजाच्या लगेच लक्षात येतात. आपण असे आहोत म्हणून स्वतःबद्दल द्वेष वाटायला लागतो. या द्वेषातून काहींची विध्वंसकवृत्ती बनते. घराबाहेर पडलं की समाजाची कुचकट नजर सारखी झोंबत राहते. यामुळे स्वत:बद्दल अजून घृणा वाढते.

 वयात आल्यावर काहींच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट घडते. ती म्हणजे अनेक पुरुष अशा बायकी मुलांकडे आकर्षित होतात. इतर वेळी त्रास देणारे, कुचकटपणे बोलणारे परके पुरुष लैंगिक सुखासाठी ओळख काढू लागतात. खायला, प्यायला घालतात. नवीन कपडे भेट देतात. याच्यामुळे स्वत:कडे बघायची दृष्टी बदलते. आत्तापर्यंत आपल्यात एकही चांगला गुण नाही, अशा रसातळाला गेलेल्या

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख

३७