पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असतात आणि दिसण्यावरून त्या स्वत:ला पुरुष मानतात हे कळायला काहीही मार्ग नसतो.

 प्रत्येकाचा लिंगभाव नैसर्गिक आहे. तो शिकून-शिकवून घडत नाही. मुलांना/मुलींना तुम्ही लहानपणी कसं वाढवता यावरून तो शिकला जात नाही. उदा. लहानपणी मुलाला मुलीचे कपडे घातले की त्यामुळे त्याचा लिंगभाव मुलीचा होत नाही. तसंच कुणाचं अनुकरण करूनही तो बदलत नाही. उदा. एखादा मुलगा मुलींमध्ये वाढला तर त्या मुलाचं चालणं, बोलणं बायकी होऊ शकतं. पण म्हणून त्याचा लिंगभाव मुलीचा होत नाही. तो स्वतःला मुलगी समजायला लागत नाही. म्हणजेच लिंगभाव हा शिकून येत नाही. तो पोहऱ्यात यायला आडात असावा लागतो. मारहाण करून किंवा कोणत्याही वैदयकीय उपायांनी लिंगभाव बदलता येत नाही.जो लिंगभाव आहे तो स्वीकारणं हेच सर्वांच्या हिताचं असतं.

  मला काही ट्रान्सजेंडर व्यक्तींचे पालक विचारतात. “या मुलाला वाढवताना आमचं काही चुकलं का? म्हणून आमच्या मुलाला मुलीसारखं वाटतं?" त्यांना सारखं वाटत राहतं, की आपण मुलाला वाढवताना कुठेतरी कमी पडलो, म्हणून, मूलं ट्रान्सजेंडर झालं. पालकांनी स्वत:ला कोसायचं काहीही कारण नाही, अपराधी वाटायचं कारण नाही. कोणाचाच लिंगभाव शिकवून घडवता येत नाही.

  सावधान - बहुतेक लहान मुलं भातुकली खेळतात, साडी नेसतात, लिपस्टिक लावतात. याचा अर्थ त्यांचा लिंगभाव मुलीचा आहे असं अजिबात समजू नये. गंमत म्हणून, कुतूहलापोटी मुलं/मुली हे सगळे खेळ खेळतात आणि त्याच्यात जास्त काही शोधण्याचा प्रयास केला जाऊ नये. तसंच काही मुलींना मोठ्या होतांना, समाजात स्त्रियांना कनिष्ठ स्थान असल्यामुळे, 'मी मुलगा का झाले नाही' असं वाटतं. तारुण्यात काहीजणी पुरुषी पेहराव करणं, केस कमी ठेवणं अशा गोष्टी करतात. अनेकांसाठी ही एक 'पासिंग फेज' असते, तर काहींमध्ये या पेहरावातून मुलांना असलेल्या संधी, स्वातंत्र्य उपभोगायची इच्छा व्यक्त होते. याचा अर्थ, त्यांच्या दिसण्यावरून त्यांचा लिंगभाव पुरुषाचा आहे हा तर्क काढणं चुकीचं होईल.

समाजाची दृष्टी

 जर मुलगा मुलीसारखं वागायला लागला तर घरच्यांचा रोष त्याच्यावर येतो. लाची म्हणाली, (हा जन्माने मुलगा. लहानाचा मोठा होताना त्याला सातत्यानं आपण मुलगी आहोत असं वाटलं. पुढे मोठा झाल्यावर याने लिंगबदल शस्त्रक्रिया केली), “माझा एक नातेवाईक घरी आला होता. मी केस धुऊन मोरीबाहेर आले. मी छातीभोवती टॉवेल गुंडाळलेला होता. जसा बायका स्तन झाकून टॉवेल गुंडाळतात तसा. तो माझ्यावर चिडला, म्हणाला, 'काय हे हिजड्यावाणी करतोस',

३६

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख