पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याच नजरेनं तो जगाकडे बघतो. तसंच बहुतेक मुलींची वाढ होताना त्यांना आपण मुलगी आहोत असं वाटत असतं व त्या मुलीच्या नजरेनं जगाकडे बघतात, जग अनुभवतात. काहींच्या बाबतीत मात्र असं नसतं. काही मुलांना लहानाचं मोठं होताना सातत्यानं वाटतं की ते मुलगी आहेत. याचा अर्थ असा, की काही मुलांची नैसर्गिक घडण अशी होते की त्यांचं शरीर मुलाचं असतं (लिंग, वृषण इत्यादी.).

पण मानसिक घडण (लिंगभाव) मुलीची असते. म्हणजे ते जग मुलीच्या दृष्टीनं बघतात व अनुभवतात.

  या गटातील पुरुष शरीरानं पुरुष असतो. म्हणजे त्याला लिंग व वृषण असतात. वयात आल्यावर लैंगिक इच्छा झाली, की लिंगाला उत्तेजना येते. म्हणजे शारीरिकदृष्ट्या तो इतर पुरुषांसारखा असतो पण मानसिकदृष्ट्या त्याचं भावविश्व 'स्त्री' सारखं असतं.

  काहींना मुलींसारखा पेहराव आवडतो. काहींचं चालणंबोलणं बायकी असतं. पण हे सर्वांच्याच बाबतीत खरं असतं असं नाही. याला अपवादही असतात. म्हणून हा 'स्टीरिओटाईप' म्हणून मानला जाऊ नये. साहजिकच हे अपवाद आपल्या सहजपणे नजरेस येत नाहीत. माझी एक मैत्रिण जन्मानं मुलगा होती. आता लिंग बदलाची शस्त्रक्रिया करून ती स्त्री बनली आहे. शस्त्रक्रिया करण्याअगोदर त्याच्या शारीरिक ठेवणीवरून, पेहराव, आवाज, वागणुकीवरून त्याचा लिंगभाव 'स्त्री' चा आहे असं कोणीच ओळखलं नसतं. शर्ट-पँटमध्ये असायचा. त्याच्या बोलण्यात, वागण्यात तो स्वत:ला 'स्त्री' मानतो हे कळायला कोणतीही बाह्य लक्षणं नव्हती. त्यांनी जेव्हा त्याचा लिंगभाव माझ्यापाशी व्यक्त केला तेव्हा मला कळलं, नाहीतर मला कळायला काहीही मार्ग नव्हता.

  असं वेगळेपणं काही मुलींमध्येही दिसतं. एखादी मुलगी लहानाची मोठी होताना स्वतःला मुलगा समजायला लागते. याचा अर्थ असा की काही मुलींची नैसर्गिक घडण अशी होते, की शरीर मुलीचं असतं पण मानसिक घडण (लिंगभाव) मुलाची असते. म्हणजे ती जग मुलाच्या दृष्टीनं बघते व अनुभवते. ट्रान्सजेंडर स्त्रिया शरीरानं स्त्री असतात. म्हणजे त्यांना भगोष्ठ, शिस्निका, योनी, गर्भाशय, स्त्रीबीजांड, स्त्रीबीजवाहिन्या हे सर्व अवयव असतात. हे सर्व अवयव कार्यशील असतात. वयात आल्यावर अशा स्त्रियांना पाळी येते. म्हणजे शारीरिकदृष्ट्या त्या इतर स्त्रियांसारख्या असतात पण मानसिकदृष्ट्या मात्र त्यांचं भावविश्व पुरुषासारखं असतं.

  काहींना मुलांसारखा पेहराव आवडतो, पुरुषी खेळ खेळायला आवडतात इत्यादी. याबाबतीतही दिसण्यावर काही नसतं. काही मुली दिसायला अत्यंत नाजूक

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख

३५