पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यावा, ही उत्सुकता वाटायला लागते. कधी सिनेमातल्या एखादया हीरो किंवा हिरॉईनवर 'प्रेम' जडतं, तर कधी वर्गातील एखादा/एखादी विद्यार्थी/विद्यार्थिनी आवडायला लागते.

 याच्या जोडीला स्वजाण होऊ लागते. स्वावलंबी बनण्याची इच्छा होते. घरच्यांच्या सावलीतून बाहेर पडायची इच्छा होते. सातच्या आत मुलींनी का घरात यायचं हा वाद प्रत्येक घरी रंगतो. मुला/मुलींच्या संप्रेरकात जसजसे बदल होतात तसतसे त्यांच्या भावनांमध्ये चढ-उतार होतात. क्षणात खूप आनंद, क्षणात खूप नैराश्य असे 'मूड-स्विंग्ज' होतात. समवयस्क मित्रमंडळींच्या कळपात राहणं वाढायला लागतं. त्यांच्यात आपण सामावले जावे, त्यांची मान्यता मिळावी यासाठी धडपड सुरू होते. विचार, वेशभूषा, आवडीनिवडी, करिअर, डेटिंग या सगळ्यांवर मित्रमंडळींची छाप पडू लागते.

 जे विविध कारणांनी घोळक्यात सामावले जात नाहीत ते एकटे पडू लागतात. विशेषतः ज्यांचा लिंगभाव किंवा लैंगिक कल किंवा जननेंद्रियांची रचना समाजमान्यतेत बसणारी नाही अशांना एकटेपणा जाणवायला लागतो. घरचे, मित्रमंडळी जवळ असूनही आपण परके आहोत याची जाण होऊ लागते.


****


मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख

३१