पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 काहीजणींची पाळी खूप लवकर किंवा काहीजणींची पाळी खूप उशिरा येते. एक ताई म्हणाल्या, “माझी मासिक पाळी १७-१८ दिवसांनी येते." तर काहींची पाळी ४०-४५ दिवसांनी येते. तसेच पाळी सुरू झाली की ती किती दिवस चालेल यातही वैविध्य दिसतं. काहींची पाळी १-२ दिवस चालते, तर काहींची ८-९ दिवस चालते. पाळीत रक्तस्रावाच्या प्रमाणातही वैविध्य दिसतं. “माझी पाळी म्हणजे एक-दोनच ठिपके असतात. याची मला काळजी वाटते." तर काहीजणी सांगतात, "माझं खूप रक्त जातं. काही प्रॉब्लेम आहे का?" असे विविध प्रश्न स्त्रियांना भेडसावतात.

 जर चारएक महिने सातत्यानं आपल्या पाळीत काही वैविध्य दिसलं तर अॅलोपॅथिक डॉक्टरकडे जाऊन तपासून घेणं जरूरीचं आहे. अनेकवळा काहीही प्रॉब्लेम नसतानासुद्धा ही वैविध्यं पाळीत दिसू शकतात. पण काहीवेळा आजार, रोगही असू शकतात. उदा. गर्भाशयात गाठी असतील, गर्भाशयमुखाला जिवाणूंची लागण झाली असेल, कर्करोग असेल तर असे काही बदल दिसू शकतात.

 एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक स्त्रीच्या मासिक पाळीच्या वेगळेपणाची कारणं वेगवेगळी असू शकतात. दोन बायकांमध्ये पाळीच्या संदर्भात समस्या तीच असली तर त्या समस्येचं निदान वेगवेगळं असू शकतं. म्हणून जर वेगळेपण दिसलं तर अॅलोपॅथिक डॉक्टरांकडून सल्ला घेणं गरजेचं आहे. असा त्रास अंगावर काढू नये. आपल्या पाळीच्या वेगळेपणाचा आपणच तर्क न लावता डॉक्टरांकडून तपासून सगळं ठीक आहे हे त्यांच्याकडून येऊ देत.


मासिक पाळी न येणं

 १६ वं वर्ष पूर्ण होईपर्यंत सर्व मुलींना मासिक पाळी येणं अपेक्षित आहे. काहींना हे वय उलटलं तरी पाळी येत नाही. अशावेळी डॉक्टरांकडून तपासून घ्यावं. स्त्रीबीज परिपक्व करण्यासाठी, पाळी येण्यासाठी इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रोन हे संप्रेरक योग्य प्रमाणात, योग्य वेळी निर्माण व्हावे लागतात. ते काही कारणांनी आवश्यकतेप्रमाणे तयार झाले नाहीत, तर स्त्रीबीज परिपक्व होण्यास, पाळी येण्यात अडचण येऊ शकते.

 आपल्या देशात स्त्रियांमध्ये कुपोषणाचं प्रमाण खूप आहे. कुपोषणामुळेही पाळी चक्रात बदल होऊ शकतो. पाळी बंद होऊ शकते.

मानसिक बदल

 तारुण्यात आल्यावर सर्वांना लैंगिक आकर्षण वाटू लागतं. एखादया व्यक्तीचं आपल्याकडे लक्ष जावं, त्या व्यक्तीचा सहवास लाभावा, स्पर्श व्हावा, शरीरसंबंध

३०

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख