पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बल्बोयुरेथ्रल ग्रंथी

 मूत्रमार्गाला लागून बल्बोयुरेथ्रल ग्रंथी असतात. या ग्रंर्थीचं मुख मूत्रमार्गात उघडतं. यांचं कार्य अजून शास्त्राला कळलेलं नाही

योनिमुख

 मूत्रमार्गमुखाच्या खाली योनिमुख असतं. बहुतेक मुलींच्या योनिमुखावर एक पातळ कातड्याचा पडदा असतो. याला 'योनिपटल' म्हणतात. काहीजण याला 'पडदा' किंवा 'सील' असंही म्हणतात. योनिपटलाला एक किंवा अनेक छिद्रं असतात. मुलगी वयात आली व तिला पाळी आली, की या छिद्रातून पाळीचं रक्त योनिमुखातून बाहेर येतं.

योनी

 योनिमुखापासून शरीरात जी नलिका जाते, तिला आपण योनी म्हणतो. ही नलिका लवचिक असते. या नळीच्या आतल्या बाजूस कमी- जास्त प्रमाणात ओलावा असतो.

 योनीच्या आतल्या बाजूस योनीचं संरक्षण करणारे अनेक जिवाणू असतात. यांचं संतुलन बिघडलं, तर दुर्गंधीयुक्त, दयासारखा फेसाळ स्राव येऊ लागतो. (बघा सत्र - एसटीआय/एचआयव्ही/एड्स).

संभोगाच्या वेळी पुरूष त्याचं लिंग स्त्रीच्या योनीत घालून संभोग करतो. बाळंतपणाच्या वेळी मूल योनीतून बाहेर येतं.

बारथोलिन ग्रंथी

 योनिमुखाच्याजवळ दोन बारथोलिन ग्रंथी असतात. या ग्रंथीचं मुख योनीमुखाजवळ उघडतं. यांच्यात एक स्राव तयार होतो.

गर्भाशयमुख/ग्रीवा

 योनी जिथे संपते व गर्भाशय सुरू होतं त्या भागाला 'गर्भायशमुख' म्हणतात. गर्भाशयमुखात एक विशिष्ट स्त्राव तयार होतो. स्त्रीबीज परिपक्व होऊन स्त्रीबीजवाहिनीत आलं, की या काळात हा स्त्राव पातळ होतो. याच्यातून पुरुषबीज सहज पुढे सरकू शकतात. इतर वेळी हा स्त्राव घट्ट असतो व पुरुषबीजं याच्यातून सहजपणे पुढे सरकू शकत नाहीत.


२६

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख