पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्पाँजीओसम नळ्यांमध्ये जास्त रक्तपुरवठा होतो. पाणी भरल्यावर जसा फुगा फुगतो तसा लिंगात जास्त रक्तप्रवाह होऊन लिंग उत्तेजित होतं. संभोग झाला की वीर्यपतन होतं. मग शरीर लिंगातील या नळ्यांमधील रक्तप्रवाह कमी करतं. फुग्यातून पाणी काढल्यावर फुगा जसा छोटा होतो तशी लिंगाची उत्तेजना जाते.

वीर्यपतन

 वीर्यपतनाच्या वेळी वृषणातील पुरुषबीजं, वीर्यकोषातील वीर्य, स्राव एकत्र होऊन लिंगावाटे बाहेर येतं. हे वीर्य पांढरं किंवा पिवळसर असतं. चिकट व काही प्रमाणात घट्ट असतं. वीर्यपतन झालं की थोड्याच वेळात हे वीर्य पातळ होतं. एका वीर्यपतनात अंदाजे २-५ एमएल (ml) वीर्य असतं. (अंदाजे एक चमचा.) अंदाजे या शब्दाला महत्त्व आहे. एकदा वीर्यपतन झालं व एक तासाभरात परत संभोग झाला तर वीर्याचं प्रमाण कदाचित २-४ थेंबच असेल. म्हणजे वीर्यनिर्मिती व्हायला काही काळ लागतो. जसं वय वाढतं तसं वीर्यनिर्मिती व्हायला जास्त काळ लागतो. वीर्याच्या घट्टपणात, त्याच्या रंगावर किंवा त्याच्या प्रमाणावर संभोगाची क्षमता किंवा प्रजननक्षमता अवलंबून नसते.


झोपेत वीर्यपतन होणं

 वयात आल्यापासून पुरुषबीजनिर्मिती व वीर्यनिर्मिती आयुष्यभर चालू राहते. हस्तमैथुन किंवा संभोग केला कीवीर्यपतन होतं व वीर्यकोष रिकामे होतात. वीर्यनिर्मिती सारखी चालू असल्यामुळे हे वीर्यकोष परत भरू लागतात. अगदी म्हातारपणापर्यंत वीर्यनिर्मिती चालू राहते, म्हातारपणात मात्र तिचं प्रमाण खूप कमी होतं. काही दिवसांत वीर्यकोष पूर्ण भरतात. हस्तमैथुन किंवा संभोग झाला नाही तर हे कोष रिकामे करायचा शरीरापाशी मार्ग आहे. झोपेत लैंगिक स्वप्न पडून वीर्यपतन घडतं. (कधीकधी हे वीर्यपतन झोपेत न होता दिवसाढवळ्या एखादं उत्तेजित करणारं चित्र बघून अनपेक्षितपणे होऊ शकतं.) काहीजण याला 'स्वप्नदोष' म्हणतात. हा दोष नाही. जर अधूनमधून (उदा. आठवड्यातून तीनदा) हस्तमैथुन केला, तर हे अनपेक्षितपणे किंवा झोपेत होणारं वीर्यपतन टाळता येतं.


स्त्रियांची जननेंद्रियं

मोठं व छोटं भगोष्ठ

 चित्रात जो मांसल भाग दाखवला आहे, त्याला मोठं भगोष्ठ म्हणतात. याचे ओठं उघडले की आतील मांसल भाग दिसतो. याला छोटं 'भगोष्ठ' म्हणतात.

२४

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख