पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पॅराफायमॉसिस

  काही वेळा फायमॉसिस असलेल्या पुरुषांची शिस्नमुंडावरची त्वचा संभोगाच्या वेळी खूप त्रासानं मागे येते, पण मग परत पुढे सरकत नाही. ती मागे घट्ट अडकून बसते. याला 'पॅराफायमॉसिस' म्हणतात. अशा वेळी शस्त्रक्रिया करून ही त्वचा काढून टाकावी लागते.

स्मेग्मा

  शिस्नमुंडावरच्या त्वचेच्या खाली एक विशिष्ट स्राव तयार होतो. तो वाळला की त्याची पांढरी पूड बनते. याला 'स्मेग्मा' म्हणतात. जर शिस्नमुंडाच्या वरची त्वचा मागे घेतली तर काहीवेळा ही पावडर शिस्नमुंडाच्या कडेला दिसते. या पावडरचा वास येतो. दररोज अंघोळीच्या वेळी शिस्नमुंडावरची त्वचा मागे घेऊन, साबणानं व पाण्यानं शिस्नमुंड धुऊन हा 'स्मेग्मा' काढून टाकावा.

पुरुषबीजवाहिनी

 प्रत्येक वृषणातून पूरस्थ ग्रंथीकडे जाणारी एक पुरुषबीजवाहिनी असते. वीर्य पतनाच्या वेळी वृषणांतील पुरुषबीजं या नळ्यातून पूरस्थ ग्रंथीकडे जातात.

वीर्यकोष

 पूरस्थ ग्रंथीच्या बाजूला दोन वीर्यकोष असतात. मुलगा वयात आला की त्याच्या वीर्यकोषात वीर्य तयार व्हायला लागतं.

मूत्राशय

 दोन मूत्रपिंडांतून येणारी लघवी मूत्राशयात साठवली जाते. मूत्राशयाच्या खालच्या भागामध्ये काही स्नायू असतात. वीर्यपतनाच्या वेळी हे स्नायू मूत्राशयमुखाला बंद करतात व वीर्याला मूत्राशयात जाऊ देण्यापासून रोखतात, (व वीर्य लिंगावाटे बाहेर येतं).

मूत्रमार्ग

 मूत्राशयातून एक नळी पूरस्थ ग्रंथीतून लिंगात जाते. या नळीतून लघवी मूत्राशयातून लिंगावाटे बाहेर सोडली जाते. वीर्यपतनाच्या वेळी वीर्य याच नळीतून लिंगावाटे बाहेर सोडलं जातं.


२२

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख