पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बालपण


 सकाळची वेळ. मी डॉ. भूषण शुक्ल यांच्या कार्यशाळेत बसलो होतो. लहान मुलांच्या वाढीबद्दल ते पालकांशी संवाद साधत होते. मी पालक नसलो तरी मला त्यांचं सत्र ऐकायची खूप उत्सुकता होती, म्हणून आलो होतो. माझी उत्सुकता दुर्दैवानं पालकांमध्ये नव्हती. त्या सत्राला फारजण उपस्थित नव्हते. कदाचित लहान मुलांचा फॅशन शो असता तर जास्त पालक आले असते.

 एका बाईने हात वर केला, माईक हातात घेऊन तिनं प्रश्न विचारला, 'मुलांना अंघोळ घालताना त्यांच्या जननेंद्रियांना कोणती नावं दयावीत?' हा प्रश्न मलाही अनेक वेळा कार्यशाळेत विचारला जातो. मी प्रशिक्षणार्थीना विचारतो, की 'तुम्ही लहान मुलांना अंघोळ घालताना मुलांशी काय बोलता? काही म्हणतात, की "आम्ही देवाचं नाव घेतो - 'हरी ओम". काहीजण काहीच बोलत नाहीत. काहीजण अंघोळ घालताना, 'आता आपण हाताला साबण लावू", "पायाला साबण लावू" असं म्हणत अंघोळ घालतात. याच्यामुळे मुलांना आपल्या अवयवांची नावं कळायला लागतात. पण जेव्हा त्यांना मी विचारतो, की "जननेंद्रियांना काय नावांनी संबोधता?" तेव्हा बहुतेकजण गप्प बसतात.

 काही वेळा जननेंद्रियांना 'मामा', 'काका', 'मावशी', 'सासूबाई', 'आत्या' अशी नावं देऊन नातेवाइकांबद्दलचा जिव्हाळा व्यक्त केला जातो. काहीजण 'शू' ची जागा, 'शी' ची जागा असं म्हणतात. मग मी विचारतो, की “आपण नाकाला श्वास घ्यायची जागा म्हणतो का? मग आपण लिंगाला 'शू' ची जागा का म्हणायचं? लिंग हा शब्द का वापरू नये?" मी सांगतो, की पालकांनी न संकोच करता अवयवांची नावं मुलांबरोबर वापरावीत.

 योग्य शब्दांचा वापर करायची सवय मुलांना लहानपणापासून लावली पाहिजे. त्या अवयवांबद्दल मुलांना एखादा प्रश्न विचारायचा असेल, काही बोलायचं असेल तर त्यांना त्या अवयवांची योग्य नावं माहिती पाहिजेत. आपण त्या अवयवांची नावं न लाजता घेतली की मुलांपर्यंत संदेश पोहोचतो की ती नावं त्यांनीही वापरण्यास हरकत नाही.


मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख

१३