पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिकावं, तर तिथेही पुरेशी माहिती उपलब्ध नाही. जी आहे ती एखादा विषय किती वाईट पद्धतीनं मांडला जावा याचंच एक नामवंत उदाहरण ठरतं.

 एका नववीच्या पाठ्यपुस्तकात पुरुष व स्त्रीच्या जननेंद्रियांच्या आकृत्या आहेत. एका ओळीत पुरुषांच्या जननेंद्रियांची नावं आहेत व एका ओळीत स्त्रियांच्या जननेंद्रियांची नावं आहेत. बस! त्या अवयवांच्या कार्याचा एक शब्दाने उल्लेख नाही.

 एका दहावीच्या पाठ्यपुस्तकात एचआयव्ही/एड्सबद्दल माहिती दिली आहे. माहितीमध्ये गवाक्ष काळाचा (विंडो पीरिअड) उल्लेख नाही. 'एआरटी' औषधांमुळे एचआयव्ही संसर्गित व्यक्तीचं आयुष्यमान वाढतं हा महत्त्वाचा मुद्दा मांडलेला नाही.

 एचआयव्ही संसर्गित व्यक्तीशी भेदभाव करू नये अशी एकही ओळ नाही. पण "It should be impressed upon the public that they should lead a clean life and not indulge in unlawful sexual contact." असा सल्ला

आहे. 'unlawful' म्हणजे काय म्हणायचंय?

 द्राविडी प्राणायाम करून पहिल्यांदा एचआयव्ही/एड्स व नंतर गुप्तरोगाची माहिती आहे. गुप्तरोगाच्या भागात लक्षणंही नाहीत व यांतील अनेक गुप्तरोग अॅलोपथिक औषधं घेतली, तर पूर्णपणे बरे होतात याचा उल्लेख नाही. अशा शिक्षणातून विदयार्थ्यांना काय मिळणार आहे?

 स्त्री असो, पुरुष असो, भिन्नलिंगी असो, समलिंगी असो, ट्रान्सजेंडर असो, जननेंद्रियांत वेगळेपण असलेल्या व्यक्ती असोत, एसटीआय/एचआयव्ही/एड्स संसर्गित व्यक्ती असो या सर्वांना सामावून घेणारी दृष्टी लैंगिकतेच्या शिक्षणात असणं गरजेचं आहे. लैंगिकतेचं शिक्षण व त्याच्या जोडीला शाळा/कॉलेजमधील कॉन्सेलर्स ही आजची फार मोठी गरज आहे. हे शिक्षण निकोप दृष्टीनं देणं महत्त्वाचं आहे. मुला/मुलींच्या शरीरात वेगळेपण आहे, सगळ्यांचा लैंगिक कल व लिंगभाव सारखा नाही तरीपण ते सर्व समान आहेत, समान अधिकारांच्या पात्रतेचे आहेत, हा मानवाधिकाराचा पाया लैंगिकतेच्या शिक्षणात उतरलाच पाहिजे. लैंगिक नाती असू देत नाहीतर कुटुंब नियोजन असू देत, प्रत्येक मुला/मुलीला सर्व पर्यायांची माहिती देणं व त्यांच्या गरजांनुसार त्यांना त्यांची लैंगिक जीवनशैली निवडायचा अधिकार मिळणं गरजेचं आहे. कदाचित अनेकजण जे पर्याय निवडतील ते पर्याय आपल्याला पटणारे नसतील. पण ते पर्याय लैंगिकतेचं ज्ञान व त्याच्याबरोबरची जबाबदारी जाणून निवडलेले असतील आणि हाच खरा लैंगिकतेच्या शिक्षणाचा उद्देश आहे.


१२

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख