पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

किंवा 'देवऋषीपण' करतात. काही जोगते शर्ट-पँटवर राहतात तर काही साडी घालतात. काही जोगते वेश्याव्यवसाय करतात. उदरनिर्वाहाची पर्यायी साधनं माझ्या संस्थेचा प्रयत्न असतो की हिजड्यांना, जोगत्यांना नोकरीची संधी मिळावी. संस्थेच्या कामगार वर्गात काही हिजडे आहेत, काही जोगते आहेत. त्यांना मुख्य समाजप्रवाहात आणायचा माझी संस्था प्रयत्न करते. पण तशी कामाची संधी मिळाली तरी फार थोडे हिजडे, जोगते ती घेतात. कधीही नोकरी न केल्यामुळे अनकेजणांना नोकरीची शिस्त नसते. अनेकजण दोन-चार महिन्यांत सोडून जातात. दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मिळकत. ९वी-१०वी शिकलेल्यांना नोकरी करून किती पगार मिळणार? २०००-३००० रुपये महिना. हेच त्यांनी मंगती केली, बिडे/बयाने केले, 'देवऋषीपण' केलं तर त्याचे महिन्याला पाच हजार रुपये सहज सुटतात. लोक दया भावनेनं देतात किंवा हिजड्यांनी त्रास देऊ नये म्हणून पैसे देतात (काही हिजडे अश्लील वर्तन करून, दमदाटी करून पैसे मागतात). लोक हिजड्याचा शाप खरा ठरेल या अंधश्रद्धेमुळे पैसे देतात. काही हिजडे नाचून, काही वेश्याव्यवसाय करून पैसे मिळवतात. काही जोगते 'देवऋषीपण' करून 'तुला अमक्या मुलीशी लग्न करायचंय तर तिचा एखादा कपडा आण. इतके पैसे दे. तंत्रमंत्र करून दोन महिन्यात ती वश होईल', अशा प्रकारचा धंदा करतात. अंधश्रद्धेचा सुकाळ असल्यामुळे हा धंदा तेजीत असतो. असे पैसे मिळत असतील तर मग आठ तास नोकरी कोण करणार? असं असलं तरी, मुख्य समाजप्रवाहात येण्यासाठी त्यांना समान संधी मिळत राहिली पाहिजे. ती त्यांनी घ्यायची की नाही हा निर्णय त्यांच्यावर सोडून दयावा असा मी विचार करतो. मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख २३९