पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याच्यापासून ते आजार बायकोच्या वाट्याला येतात.

  कुटुंब नियोजनाची साधनं वापरणं असू देत किंवा संतती नियमनाची शस्त्रक्रिया करणं असू देतं, या सर्व, सोईनं स्त्रीच्या जबाबदाऱ्या समजल्या जातात. मुलगा झाला नाही तर स्त्रीला जबाबदार धरलं जातं.

  लिंगभेद व लैंगिकतेबद्दलची पूर्वग्रहदूषित दृष्टी उतारवयातही आपल्या आयुष्यात डोकावत राहते. मी एकदा काही स्त्रियांबरोबर लैंगिकतेची कार्यशाळा घेत होतो. वाढतं वय व लैंगिक गरजा' याच्याबद्दल गटातली चर्चा ऐकत होतो. एका गटाकडून आलं, की "आमच्या ग्रुपमध्ये चर्चेत असं ठरलंय, की पन्नाशी आली की म्हातारपण आलंय असं गृहीत धरायचं, म्हणून पन्नाशीनंतर सेक्स करणं लोकानी बंद करावं." दुसऱ्या एका गटाने हे वय पंचेचाळीस ठरवलं, तर तिसऱ्या गटाने साठ वर्ष ठरवलं. लैंगिक इच्छांना प्रत्येकजण आपापली काल्यबाह्य तारीख' लावत होते.

  "अर्धी हाडं मसणात गेली तरी या जोडप्याला अजून एकांत का हवा आहे?" हा विचार अनेकांच्या मनाला शिवतो. लैंगिक इच्छांचं प्रकटीकरण सोडाच, या वयात एखादया सुंदर पुरुषाकडे किंवा स्त्रीकडे बघून लैंगिक इच्छा होणंही चुकीचं समजलं जातं. पण यातही दुटप्पीपणा दिसतो. एक ताई म्हणाल्या, “पुरुषाचं एक वेळ मी समजू शकते पण बायकांनी म्हातारपणी असं का वागावं?"

 लैंगिक शिक्षण

  लैंगिकतेकडे निकोपपणे बघण्याची दृष्टी निर्माण व्हावी म्हणून वयात यायच्या वेळी मुला/मुलींना लैंगिकतेचं सर्वांगीण शिक्षण देणं आवश्यक आहे. वयात आलेल्या मुला/मुलींना लैंगिक ज्ञानापासून वंचित ठेवणं माझ्या मते घोर अपराध आहे. या ज्ञानापासून तरुणांना जाणूनबुजून वंचित ठेवणं हे त्यांच्या मूलभूत अधिकारांचं आहे. अशानं आपण त्यांचं किती अतोनात नुकसान करतो, हे सांगण्यास शब्द कमी पडतात. शारीरिक व मानसिक लैंगिक आरोग्याबद्दल जी उदासीनता या देशात आहे, ती अत्यंत लांच्छनास्पद आहे.

  पालकांनी मुलांशी लैंगिक विषयावर कधीही संवाद साधला नसल्यामुळे

त्यांच्याकडून काहीही माहिती मिळणं, मार्गदर्शन होण्याची शक्यता नसते. (खरंतर एका दृष्टीनं ते चांगलं आहे, कारण पालकांना लैंगिकतेचं शिक्षण मिळालं नसल्यामुळे ते आपल्या पाल्याला काय शिकवणार? पण निदान पालकांना याचं

महत्त्व जरी कळलं तर ते एखादं लैंगिकतेवरचं पुस्तक आपल्या पाल्याला भेट देऊ शकतात.)

  लैंगिक विषयावर बोलणं आपल्या संस्कृतीत बसत नाही या सबबीखाली लैंगिक

शिक्षण व त्यातील मायना हा कायम वादग्रस्त विषय राहिला आहे. काय

१०

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख