पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

"मला पहिल्यांदा झोपेत वीर्यपतन झालं तेव्हा मी खूप घाबरलो होतो. मला कोणता तरी आजार झाला का? असं वाटलं." हा सातत्यानं ऐकू येणारा मुलांचा अनुभव व "मला पहिल्यांदा पाळी आली तेव्हा मला आईने काहीच सांगितलं नव्हतं. मी घाबरून गेले. रडू आवरे ना, मी खूप रडले. काय सांगू आईला आणि कसं सांगू?" हा मुलीचा अनुभव मी किती वेळा ऐकला आहे म्हणून सांगू? वेळेवर ज्ञान देऊन मुलां/मुलींची भीती टाळता आली नसती का?

 शारीरिक बदलांची ही स्थिती आहे तर मानसिक आरोग्याबद्दल काय सांगायचं?मुला-मुलींना विचारलं, की "तुम्हांला लैंगिक इच्छा होतात का?" तर लगेच शरमेनं बहुतेकजण मान खाली घालतात. जणू काही त्या इच्छा होणं चुकीचं आहे. पण ही शरम स्वाभाविक आहे, कारण जिथे त्या इच्छांशी निगडित अवयव घाण मानले जातात, तिथे त्या इच्छा घाण मानल्या जातील तर काय नवल? या इच्छा वयात आल्यावर मुला/मुलींना होणं स्वाभाविकच आहे हे जर त्यांना सांगितलं नाही, तर या विषयावर संवाद कसा साधणार?

  लिंगभेदाच्या चुकीच्या संकल्पना, लैंगिक अज्ञान, चुकीचे संदेश, अर्धवट माहिती, फक्त स्वत:च्या लैंगिक सुखापुरता बायकोचा विचार करणारा नवरा व संवादाचा संपूर्ण अभाव या सर्व पैलूंचा परिणाम नवरा-बायकोच्या लैंगिक नात्यात उतरतो. अशा परिस्थितीत स्त्रीचा लैंगिक अनुभव किती सुखकारक असणार? उत्तेजित लिंगाची लांबी असो किंवा संभोगाचा कालावधी असो, अश्लील वाङ्मय व मित्रांकडून मिळालेल्या चुकीच्या माहितीतून अवास्तव अपेक्षा निर्माण होतात. त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की जोडप्यातील ताण वाढतो.

  लिंग असमानतेच्या खुळ्या कल्पनेमुळे स्त्रीनं संभोगासाठी पुढाकार घेतला, तर अनेक पुरुषांना अस्वस्थ व्हायला होतं. कार्यशाळेत मला दिसतं की संभोगात 'वूमन ऑन टॉप' पोझिशनबद्दल बोलायला लागलं, की पुरुषांना असुरक्षित वाटायला लागतं. (त्यांना ही पोझिशन कमीपणाची वाटते.) बायको आजारी असो, तिला पाळीचा त्रास असो किंवा मूड नसो, नवऱ्याला लैंगिक इच्छा झाली की तिनं तयार असलंच पाहिजे ही धारणा बनलेली असते. तिनं नाही म्हटलं की नवऱ्याचा अहंकार दुखावणार, मारहाण किंवा जबरदस्ती वाट्याला येणार हे अनुभवानं तिला माहीत झालेलं असतं. एक ताई म्हणाल्या, “मी क्वचित जरी नाही म्हणाले तरी हे डोक्यात राग घालून घेतात, शिव्या देतात, म्हणतात, 'तुझ्या आईला.. जातो मी बाहेर' व बाहेरच्या बाईकडे जातात." इतर कोणाकडे लैंगिक सुखासाठी गेलं, तर निरोध वापरून संभोग करणं महत्त्वाचं आहे हे माहीत नसतं. असुरक्षित संभोग झाला तर संसर्गित व्यक्तीपासून एसटीआय/एचआयव्ही/ एड्सची लागण होण्याची शक्यता असते. त्याला अशी लागण झाली की

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख

०९