पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माणसांवर एखादया घटकाचा काही परिणाम होतो का? कसा होतो? किती काळाने होतो? असे असंख्य प्रश्न अजून कोडीच आहेत. हवेतील प्रदूषण कारखान्याजवळ राहणाऱ्या लोकांना हवेच्या प्रदूषणाचे परिणाम कळत नकळत दिवस-रात्र भोगावे लागतात. हे परिणाम हवेतील कण, रसायनं, वायूंमुळे होत असतात. हे कण फुफ्फुसात शिरून शरीराला ऑक्सिजन मिळण्यास अडथळा निर्माण करतात व ते जिथे रुजतात त्या ठिकाणी सूज येऊन शरीराला इजा होऊ शकते. कणांबरोबर हवेत अनेक रसायनं आहेत. ती आपल्या कातड्याला चिकटतात, श्वास घेताना फुफ्फुसात जातात, हवेतील कणांना चिकटून कणांबरोबर ही रसायनं आपल्या फुफ्फुसात पोहोचतात. ही रसायनं डिझेल व पेट्रोलच्या गाड्यांच्या धुरातून येतात, घरातल्या शेण, कोळसा, लाकडाच्या जळणातून येतात, विविध कारखान्यांच्या धुराड्यांतून येतात. जिथे घरं छोटी आहेत, हवा खेळायला पुरेशी जागा नाही, लाकडाच्या, शेणाच्या व कोळशाच्या चुली आहेत, तिथे हवेचं प्रदूषण खूप दिसतं. बायका, त्या सांभाळत असलेली लहान मुलं चुलीजवळ खूप वेळ बसत असल्यामुळे त्यांना त्याचा सर्वात जास्त त्रास होतो. खोकला, दमा, डोळ्यांची जळजळ होणं या लक्षणांबरोबरच लवकर प्रसूती होणं, कमी वजनाची मुलं जन्माला येणं, मृत मुलं जन्माला येणं अशा शक्यता वाढतात. हवेतील प्रदूषणाचा पुरुषबीज निर्मितीवर काय परिणाम होतो यावर झालेल्या एका पाश्चात्त्य देशातल्या अभ्यासात प्रदूषणाच्या काळात पुरुषबीजांच्या आकारावर, पुरुषबीजांच्या पुढे सरकण्याच्या क्षमतेत विपरीत परिणाम दिसून आला व काही पुरुषबीजांच्या गुणसूत्रांमध्ये दोष दिसून आला. पाण्यातील प्रदूषण अनेक रसायनं ही 'पोटेंशियल एण्डोक्राईन डिसरपटर्स' म्हणून ओळखली जातात. याचा अर्थ या रसायनांमुळे आपल्या संप्रेरकांच्या निर्मितीत, संतुलनात बदल होऊ शकतो. अशी अनेक रसायनं कारखान्यात वापरली जातात व सांडपाणी म्हणून नदीत सोडून दिली जातात. नदीत सोडलेल्या या रसायनांमुळे नयांमधील नर-माशांच्या प्रजनन संस्थेवर विपरीत परिणाम होतो. हे बदल जर माशांमध्ये दिसत असतील तर हे नदीतील पाणी आपल्या पिण्यात आलं, तर त्याचा आपल्यावर काही परिणाम होतो का? याच्यावर काही प्रमाणात संशोधन चालू झालं आहे. मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख २१९