पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कितीवेळा संवेदनशीलपणे मांडली जातात? अशी उदाहरणं अपवादात्मकच आहेत, कारण जसं खरं स्त्रीत्व हे मातृत्वाशी जोडलं गेलं आहे, तसंच अस्सल पुरुषत्व हिंसा, सत्ता, भिन्नलिंगी कामुकतेशी जोडलेलं आहे. मुलींची छेड काढणं हे पुरुषार्थाचं लक्षण आहे, त्यांचा पिच्छा पुरवला की त्या शेवटी हो म्हणतातच हा गैरसमज, प्रेयसी संभोगाला नाही म्हणाली तरी तिची इच्छा आहे, असा सोईचा अर्थ लावणं, प्रौढ व्हायच्या आत, आपली जबाबदारी समजायच्या आत प्रेमाखातर जोडीदाराबरोबर घरातून पळून जाणं हे सगळे संदेश सिनेमातून येतात. “आमच्या शाळेतील सातवीतील मुलगा एका मुलीबरोबर पळून गेला. सिनेमात होतं तसं." अशी अनेक उदाहरणं माझ्या कार्यशाळेत ऐकायला मिळतात.

 लैंगिकतेशी निगडित एवढे असंख्य संदेश मुला/मुलींपर्यंत पोहोचत असतात, पण महत्वाचा एकही संदेश त्यांना मिळत नाही.

लैंगिकतेकडे बघायचा दृष्टिकोन

 आपल्या शरीराकडे बघायचा दृष्टिकोनच बघा. लैंगिक शिक्षणाच्या कार्यशाळेत मला कळतं, की बहुतांशी प्रशिक्षणार्थिनी कधीही घरी कोणी नसताना दारं, खिडक्या लावून पूर्ण नग्न होऊन आपलं शरीर पाहिलेलं नसतं. शरीराच्या अवयवांवरून आपला हात फिरवलेला नसतो. कारण विचारलं तर, “खालचे अवयव घाण आहेत", "आपल्या संस्कृतीत हे बसत नाही." "त्यात काय बघायचंय?", “आपलं शरीर बघायला लाज वाटते", "हे वाया गेल्याचं लक्षण आहे," अशी उत्तरं मिळतात किंवा "अंघोळीच्या वेळी बघितलं जातं ना, अजून वेगळं काय बघायचं?" (अंघोळीबद्दल बोलायचं झालं तर काहीजणांना उघड्यावर अंघोळ करावी लागते. त्यामुळे जननेंद्रियांची स्वच्छता करता येत नाही. तर अनेकजण असे आहेत की स्नानगृहात अंघोळ करत असले तरी चड्डी घालूनच अंघोळ करतात. जननेंद्रियांना साबणाचा स्पर्श होत नाही.)

 पुरुषांची जननेंद्रियं बाहेर असल्यामुळे ती त्यांना सहज दिसतात. (बघायची इच्छा असो वा नसो) पण स्त्रियांचं तसं नसतं. भगोष्ठांनी त्यांचं मूत्रमार्गाचं मुख, योनिमुख झाकलेलं असतं. जोवर स्त्रिया आपलं भगोष्ठ उघडून आपली जननेंद्रियं न्याहाळत नाहीत तोपर्यंत त्यांना त्यांची बास्य-रचना माहीत होत नाही आणि म्हणूनच अनेक पुरुषांना आणि स्त्रियांना, “स्त्रीची लघवी कुठून येते? हे चित्रात दाखवा", असं म्हटलं की ते स्त्रीच्या जननेंद्रियांच्या चित्रात योनिमुखाच्याकडे बोट दाखवतात. ही आपल्या शरीराची ओळख, तर अवयवांच्या स्वच्छतेची काय जाण असणार?

 शरीराबद्दल जर हे अज्ञान तर जननेंद्रियांच्या कार्याबद्दल काय बोलावं?

०८

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख