पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" महिन्यापासून गर्भाची हालचाल जाणवू लागते. डॉ. ओझा म्हणाल्या, “आम्ही गर्भवती महिलेला सांगतो की सातव्या महिन्यापासून दिवसाला १० वेळा तरी बाईला हालचाल जाणवली पाहिजे. जर हालचाल फार मंद वाटली किंवा १२ तासांत हालचाल जाणवली नाही, तर आम्ही त्यांना लगेच दवाखान्यात यायला सांगतो. बत्तिसाव्या आठवड्यापासून ते प्रसूतीपर्यंत गर्भाची वाढ होते व त्याचे विशिष्ट अवयव सक्षम बनत राहतात (ग्रोथ अँड मॅच्युरिटी). सहसा आठव्या महिन्यापासून गर्भ हळूहळू फिरून त्याचं डोकं गर्भाशयामुखाच्या जवळ येतं. गर्भाची वाढ बरोबर होत आहे हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर सांगतील तेव्हा डॉक्टरांकडून तपासणी करणं गरजेचं आहे. - गर्भ पडणं घरात बाळ येणार या आनंदाच्या वातावरणात काही वेळा नैराश्यही येऊ शकतं. गर्भधारणा पूर्णत्वाला जात नाही. गर्भ मध्येच पडतो. गर्भधारणा झाली म्हणून आनंद होणं व मग गर्भ पडला की खूप नैराश्य येणं असा भावनिक चढउतार जोडप्याला सोसावा लागतो. एका दिवसात बदललेलं विश्व नैराश्य आणतं. अशा वेळी जवळच्यांची साथ व आधार मोलाचा ठरतो. गर्भ पडण्याची अनेक कारणं आहेत. यातील महत्त्वाची कारणं - फलित झालेल्या बीजात गुणसूत्रांची संख्या ४६ पेक्षा वेगळी असणं, फलित बीजाच्या गुणसूत्रात दोष असणं, मातेला 'अॅनिमिया' असणं (रक्तात लोहाचं प्रमाण कमी असणं.), गर्भाशयमुखाचं तोंड सैल होऊन गर्भ पडणं. याच्या व्यतिरिक्त गर्भाशयात गाठी असतील किंवा गर्भाशयाच्या इतर काही दोषांमुळे गर्भवाढीला अडथळा आला, गर्भाची नाळ गर्भाशयापासून सुटून आली, स्त्रीच्या विशिष्ट संप्रेरकांच्या निर्मितीत अनपेक्षित चढउतार झाले, स्त्रीला पुरेसा व पोषक आहार मिळाला नाही, गर्भाशयाला मुका मार बसला तर गर्भ पडू शकतो. प्रत्येक वेळी गर्भधारणा झाल्यावर गर्भ पडू लागला तर विविध चाचण्या करून कारणांचा शोध घ्यावा लागतो. परत गर्भधारणा झाली की जोडप्यावर (विशेषतः स्त्रीवर) कमालीचं दडपण येतं, की आता ९ महिने पूर्ण होणार का? या वेळी तरी काही अडचण नको येऊ दे' अशी तळमळीची इच्छा असते. छोट्या छोट्या शारीरिक बदलामुळेसुद्धा मनात धास्ती वाटू शकते. या तणावामुळे स्त्रीच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. १ प्रसूती प्रसूतीची तारीख ही शेवटच्या पाळीचा शेवटचा दिवस विचारात घेऊन काढली जाते. शेवटच्या पाळीच्या शेवटच्या दिवसाची तारीख + नऊ महिने + सात दिवस मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १९७