पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उचलतात. 'वीर्यपतन केलं नाही तर शरीराची ताकद वाढते'; वीर्य हे रक्ताच्या ४० थेंबांपासून बनतं'; हस्तमैथुनानं अनेक अपाय होतात'; पुत्रकामेष्टीयज्ञ केला की मुलगा होतो.' ही सर्व विधानं चुकीची आहेत, अशास्त्रीय आहेत. अशी चुकीची माहिती पसरवण्यास अनेक बाबा/महाराज (व काही वैदू) कारणीभूत आहेत. दुर्दैवानं अध्यात्माच्या नावाखाली मिळालेल्या माहितीवर डोळे मिटून विश्वास ठेवला जातो आणि म्हणून कार्यशाळेतल्या अनेक प्रशिक्षणार्थीची वाक्यं, “ते बाबा म्हणाले", "ते महाराज म्हणतात" अशी सुरू होतात. पुढे पुत्रकामेष्टी यज्ञातून मुलगी झाली तर अर्थातच तुमच्या यज्ञात तुम्ही कुठेतरी कमी पडलात, जर मुलगा झाला तर तो त्या होमामुळे झाला अशी दुटप्पी दृष्टी निर्माण होते.

 उच्चवर्गीय मुलांची स्थिती फारशी वेगळी नसते. यांच्यावर अश्लील वाङ्मय व धार्मिक वातावरणातून चुकीचे संदेश पोहोचतात. अनेकजणांकडे संगणक असल्यामुळे लहानपणापासून इंटरनेटवर अश्लील चित्रं बघायचा अनुभव असतो. मला एका सातवीतील विदयार्थ्याने विचारलं, "सर, वेबसाईटवर सेक्सची चित्रं असायची. आता ती साईट नाही उघडत. कुठे मिळेल ती?" मी काही उत्तर यायच्या आत त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या विद्यार्थ्याने, “अरे, तू... साईट का नाही बघत?" म्हणून त्याला सुचवलं होतं. इंटरनेटवर लैंगिक विषयांवर खूप माहिती उपलब्ध आहे. त्यात काही शास्त्रीय माहिती आहे, तर काही चुकीचीही माहिती आहे. या माहितीवर मुलं कोणाशी संवाद साधणार?


कॉलेजचं वातावरण

 जेव्हा मुलं शाळेतून कॉलेजमध्ये जातात तेव्हा कॉलेजचं वातावरण शाळेपेक्षा खूप वेगळं असतं. आत्तापर्यंत वस्तीच्या एका विशिष्ट संस्कृतीच्या परिचयात वाढलेल्या मुलांसाठी कॉलेज हे नवं विश्व असतं. इथे जास्त स्वातंत्र्य मिळतं व भिन्न संस्कृतीत, भिन्न आर्थिक पार्श्वभूमी असलेले मित्र-मैत्रिणी भेटतात. आपापला गट तयार होतो. आपल्याला त्यांनी सामावून घ्यावं यासाठी आपणही उत्सुक असतो. हळूहळू मित्र/मैत्रिणींमध्ये चेष्टेत जोड्या लावल्या जातात. विरुद्ध लिंगाचा जोडीदार नसेल तर त्या व्यक्तीवर कोणाला तरी पटवण्याचा दबाव असतो. हे नुसतं पटवण्यापुरतं सीमित नसतं. याच्यापुढे, “तू अजून तिच्याबरोबर काही केलंयंस की नाही?" हे 'ट्रॅकिंग'ही चालू असतं. एक युवक म्हणाला, “माझे मित्र मला सारखे विचारतात, की 'तू अजून तुझ्या गर्लफ्रेंडबरोबर सेक्स का केला नाही? तू 'गे' आहेस का?' मला काय करू कळत नाही"

  काही मित्रवर्ग वेश्येबरोबर लैंगिक अनुभव घ्यायचा ठरवतात. एक जण

०६

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख