पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अन्याय झाला, तो त्यांना दिसत नाही एवढाच फरक आहे.)

 याच्यातूनच 'कनिष्ठ' दर्जाची मुलगी हे दुसऱ्याचं धन आहे व 'श्रेष्ठ' दर्जाचा मुलगा हे आपलं धन आहे असा विचार आला आहे. मुलगी ओझं आहे जे लवकरात लवकर दुसऱ्यावर सोपवून मोकळं व्हायचं असतं, ही दृष्टी बनली आहे. म्हणून मुलीला शिकवायचं महत्त्व आपल्याला कळलेलं नाही. अभ्यास, खेळ, घरची कामं, बाहेरची कामं या सर्व बाबतीत मुला/मुलींमध्ये भेदभाव होताना दिसतो. लहानाचं मोठं होताना असे असंख्य लिंग-असमानतेचे संदेश मुलांना पालकांकडून मिळत जातात.

आजूबाजूचं वातावरण

 दुसरा संस्काराचा मार्ग असतो तो म्हणजे आपल्या आजूबाजूची वस्ती. आपण कुठल्या भागात राहणार हे अनेकवेळा आपला धर्म, जात, व्यवसाय व आर्थिक कुवतीवर ठरतं. आजूबाजूच्या वस्तीतील मुलांची संगत मिळते. जर आजूबाजूच्या मुलांची संगत चांगली नसेल तर, अनेक पालक आपली मुलं बिघडू नयेत म्हणून मुलांना दूरदूरच्या शाळेत पाठवतात. पण तरीही अवतीभोवतीच्या वातावरणाचा मुलांवर प्रभाव पडतो.

  मला एका शाळेतील सातवीतला मुलगा म्हणाला," मी काही वर्षांपूर्वी वस्तीत मोठ्या मुलांबरोबर ब्ल्यू फिल्म पाहिली. तेव्हापासून मी हातानं करायचा प्रयत्न करतो. माझं लिंग ताठ होत नाही. माझ्यात काय दोष आहे?" मी त्याला सांगितलं की, “तुझ्यात काही दोष नाही. तू अजून वयात यायचा आहेस. येत्या २-३ वर्षांत तू वयात येशील." तो म्हणाला, “नक्की येईल ना? मला खूप काळजी वाटते." त्याच्याशी बोलताना कळलं की घराच्या आजूबाजूला गरीब वस्ती. वयात यायच्या अगोदरपासून मोठ्या मुलांच्या लैंगिक विषयावरच्या गप्पा त्याच्या कानी पडल्या होत्या, त्यांच्याबरोबर राहून त्याच्यावर लवकरात लवकर वयात यायचं दडपण आलं होतं.

 काही मध्यमवर्गीय मुलांची तन्हा अजूनच वेगळी. अनेकजणांना पालक इतके जपून वाढवतात, की त्यांना स्वत:चं व्यक्तिमत्त्वच उरत नाही. आपलं मूलं ठेचकाळेल या भीतीनं, जीवनाचा कोणताच पैलू मुलांना स्वत:च्या हिंमतीवर पालक जगू देत नाहीत. अशा मुलांना लैंगिक विषयाबद्दल अज्ञान तर असतचं पण त्याचबरोबर संस्कार/अध्यात्माचा एवढा पगडा असतो की अनेकांना लैंगिक इच्छाच चुकीच्या वाटतात. मीही त्यातला. मला वयात आल्यानंतर अनेक वर्ष, लैंगिक विचार मनात येणं चुकीचं वाटायचं.

 अनेक मुलं बाबा/महाराजांनी लिहिलेल्या पुस्तकातून चुकीची माहिती

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख

०५