पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दारूचं व्यसन एखादयाला दारूचं व्यसन लागलं तरी त्याच्या ते लगेच लक्षात येत नाही. दारू पिण्यावर आपलं नियंत्रण आहे या भ्रमात ती व्यक्ती राहते. हळूहळू बेजबाबदार वागणूक, कामावर किंवा शिक्षणावर होणारा विपरीत परिणाम, पैशाची उधळण, गरजा भागवण्यासाठी खोटं सांगून घरच्यांकडून पैसे घेणं, पैसे चोरणं, वेळ पडली तर घरच्यांना दमदाटी करून पैसा मिळवणं व पित बसणं, या धुंदीत दिवसापासून रात्र कळेनाशी होते. आपले पिणारे मित्र व बाटली याच्या भोवतीच जग फिरतं. चोवीस तास दारू पिण्याबद्दल विचार डोक्यात येतात(सेलियन्स). जसजशी दारू घ्यायची सवय लागते, तसतशी शरीराला दारूची सवय होते. शरीराला सवय लागली, की तेवढाच परिणाम साधायला जास्त प्रमाणात दारू ध्यावी लागते. उदा. एक महिना दररोज १ बिअरची बाटली घेतली तर महिन्याच्या अंती पहिल्या दिवसाइतका परिणाम साधायला कदाचित १.५ बाटली बिअर घ्यावी लागेल. म्हणजेच दारूचा 'टॉलरन्स' वाढतो. अशाने हळूहळू दारू पिण्यात वाढ होते. दारू उतरायला लागली की नैराश्य येतं. भकास वाटतं. मग हा भकासपणा जावा, जरा उत्साह यावा म्हणून परत दारू प्यायची इच्छा होते. शारीरिक परिणाम दारू आपल्यावर काय व कसा परिणाम करते हे, कोणत्या प्रकारची दारू पितो? दिवसाला किती घेतो? आपल्या शरीराला दारूची किती सवय आहे (टॉलरन्स). दारूबरोबर इतर काही नशा घेतो का ? इत्यादी गोष्टींवर अवलंबून असते. शरीराला एकदा सातत्याने दारूची सवय लागली की मानसिक व शारीरिक परिणाम दिसायला लागतात. काही काळ दारू घेतली नाही तर अस्वस्थ व्हायला होणं, असुरक्षित वाटायला लागणं (ऍगझायटी अटॅक), घाबरायला होणं (पॅनिक अटॅक) असे मानसिक परिणाम दिसायला लागतात. शरीर थरथरायला लागणं, दरदरून घाम फुटणं, पोटात गोळा येणं असे शारीरिक परिणाम दिसून येतात. या लक्षणांना 'विथड्रॉल' लक्षणं म्हणतात. दारू घेतली की हे परिणाम दिसत नाहीत, नशा उतरली की हे परिणाम दिसू लागतात. दारू प्यायची सवय लागल्यावर हळूहळू व्यसनाधीन व्यक्तीचं स्वत:च्या आरोग्याकडे संपूर्ण दुर्लक्ष होतं. अंघोळ करणं, स्वच्छ कपडे घालणं या नेहमीच्या गोष्टींकडेही दुर्लक्ष होतं. खाणं कमी व पिणं जास्त यामुळे शरीराला पोषक आहार मिळण्याचं प्रमाण घटतं. त्यानी कुपोषण वाढतं. काहींना 'हायपरटेंशन', हृदयाचे ठोके चुकणं ('इररेग्युलर हार्टबीट्स'), मूत्रपिंडावर विपरीत परिणाम होणं, पोटात 'अल्सर' होणं, ‘पॅनक्रिअॅटिटीस' होण्याची शक्यता वाढते. मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १८१