पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

? जोडीदार निवडल्यावर त्याच्याशी/तिच्याशी संग करायच्या अगोदर जर याच्याआधी आपला कोणाबरोबर असुरक्षित संभोग झाला असेल, तर त्याने आपली जबाबदारी जाणून एचआयव्हीची चाचणी करून घ्यावी. जर एचआयव्ही संसर्ग झाला असेल तर जोडीदाराला विश्वासात घेऊन सत्य परिस्थिती सांगावी. एचआयव्हीसंसर्गित व्यक्तीकडे आपली बघायची दृष्टी दूषित आहे म्हणून अनेकजण याच्याबद्दल अचूक माहिती मिळवायचा प्रयत्न करत नाहीत. त्याच्यामुळे विविध संधिसाधू आजार झाले तरी डॉक्टरांकडे उपचारांसाठी जात नाहीत. एकाने तर असं डोक्यात घालून घेतलं, की “मी जेवढा जास्त सेक्स करेन तेवढं जास्त वीर्य माझ्या शरीरातून बाहेर पडेल, तेवढे विषाणू माझ्या शरीरातून निघून जातील व मी परत तंदुरुस्त बनेन." जर जोडीदार असेल तर जोडीदाराला कसं सांगायचं हा प्रश्न असतो. अनेकजण जोडीदाराला सांगायचं टाळतात. जोडीदाराला सांगितलं तर जोडीदाराची फसवणूक केली हे उघड होईल म्हणून जोडीदाराला सांगितलं जात नाही. मग तीनच पर्याय उरतात. संभोग टाळायचा किंवा निरोध वापरून संभोग करायचा किंवा निरोध न वापरता संभोग करायचा आणि जे होईल ते होईल असे दिवस काढायचे. संभोग किती दिवस टाळणार? संभोग टाळला तर जोडीदाराला, आपले बाहेर लैंगिक संबंध आहेत का? असा संशय येतो. जर बायकोबरोबर निरोध वापरायची सवय नसेल तर इतके दिवस निरोध न वापरता नवरा एकदम निरोधचा वापर करू लागला की बायको विचारणारच, की 'निरोधचा वापर का होतोय?' जर संतती नियमनाची तिची किंवा त्याची शस्त्रक्रिया झाली असेल तर निरोध वापरायचं कारण समजावणं अवघड होतं. आपल्याला एचआयव्हीचा संसर्ग झाला व हा आजार आपण आपल्या लैंगिक जोडीदारापासून जाणूनबुजून लपवून ठेवला, तर त्याच्या / तिच्या जीवाला धोका उद्भवतो. म्हणून अशी माहिती जोडीदारापासून लपवणं गुन्हा आहे - भा.दं.सं. २६९. एका केसमध्ये एक व्यक्ती एचआयव्हीसंसर्गित आहे हे कळल्यावर डॉक्टरांनी ते त्याच्या होणाऱ्या बायकोला सांगितलं. तिनं ते लग्न मोडलं. त्या व्यक्तीने कोर्टात केस दाखल केली, की डॉक्टरांनी गोपनीयतेचा भंग केला. कोर्टाने निकाल दिला, की गोपनीयता नक्कीच महत्त्वाची आहे पण इथे तिला जर सांगितलं नसतं, तर तिला त्या व्यक्तीपासून एचआयव्हीची लागण होऊन तिच्या जिवाला धोका उत्पन्न झाला असता. त्यामुळे तिच्याही आयुष्याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून डॉक्टरांनी तिला सांगण्याचा निर्णय योग्य आहे असं सांगितलं. इथे एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थितीत होतो. कॉन्सेलिंगमध्ये पूर्ण गोपनीयता पाळली जाईल हे सांगितलं जातं. याचा अर्थ तुमच्या चाचणीचा निकाल इतर कोणापाशीही तुमच्या संमतीशिवाय सांगितला जाणार नाही. पण इथे कोर्टानं दिलेला निकाल या मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १७५