पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चाचणीतून आपल्याला त्या तीन महिन्यांपूर्वी किंवा त्याच्या अगोदर केलेल्या असुरक्षित संभोगातून एचआयव्हीची लागण झाली आहे का ? हे समजू शकतं. एचआयव्हीसंसर्गित व्यक्ती आपण एचआयव्हीसंसर्गित आहोत हे चाचणीतून कळलं तर खूप मोठा धक्का बसतो. त्या रिपोर्टनी सगळं विश्व बदलतं. आता आपलं किती आयुष्य बाकी आहे? अशी चिंता लागते. नैराश्य येतं, ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचते. या सगळ्याबरोबर घरच्यांना/इतरांना कळेल ही भीती असते. काही काळासाठी अनेकांची लैंगिक इच्छा खूप कमी होते. (पण काहीजणांमध्ये मात्र 'हायपर सेक्शुअल ड्राईव्ह दिसतो. म्हणजे संभोगाचं प्रमाण खूप वाढतं.) लग्न झालं नसेल तर आज ना उद्या घरचे लग्न करण्यास आग्रह धरणार हे माहीत असतं. अशा वेळी घरच्यांना काय सांगायचं? हा प्रश्न पडतो. लग्न ठरलं तर होणाऱ्या जोडीदाराला किंवा घरच्यांना काय कारण सांगून लग्न मोडायचं? खरं कारण जोडीदाराला सांगितलं तर लग्न मोडण्याचं कारण ती व्यक्ती इतरांना सांगेल, आपल्या घरी कळेल व गावभर होईल ही भीती असते. म्हणून काही वेळा असं दिसतं की एचआयव्हीसंसर्गित व्यक्ती होणाऱ्या जोडीदारास विश्वासात न घेता विवाहबद्ध होते व जोडीदारही कालांतरानं संसर्गित होते/होतो.(अनेक वेळा असं दिसतं की संसर्गित नवऱ्यापासून बायकोला एचआयव्हीची लागण होते. पण एचआयव्हीसंसर्गित बायकोपासून नवऱ्याला लागण होण्याचीही उदाहरणं आहेत.) हे प्रश्न आहेत कारण आपली एचआयव्हीसंसर्गित व्यक्तीकडे बघाण्याची दृष्टी वाईट आहे, दूषित आहे. अशा व्यक्तींना आपण माणूस म्हणून बघत नाही, याने असं केलं. आता भोगू दे त्याला त्याची फळं', अशी जोवर आपली धारणा आहे तोवर असे प्रश्न समोर राहणारच. काही सामाजिक कार्यकर्त्यांचं मत आहे, की लग्नाआधी सक्तीनं एचआयव्ही चाचणी केली जावी, तर काहींचा या सक्तीच्या एचआयव्ही चाचणीला विरोध असतो. त्याचं म्हणणं असं, की एचआयव्ही चाचणी ही ऐच्छिकच असली पाहिजे, सक्तीनं चाचणी करणे हे मानवाधिकारांचं उल्लंघन आहे. सक्तीच्या चाचणीतून प्रश्न सुटतो का? याच्यावर विचार होणं गरजेचं आहे. एचआयव्हीची लागण झालेली नाही असा रिझल्ट आला तरी 'गवाक्ष काळ' मुळे रिझल्ट चुकीचा असू शकतो. एचआयव्ही रिपोर्टचा काळाबाजार होईल का? खोटा रिपोर्ट आणणं किती अवघड असणार आहे? माझ्यासमोरच एक उदाहरण आहे. एकाने एचआयव्हीची लागण झाल्यावर नंतर लबाडी करून, आपल्याच नावाचा एचआयव्ही विषाणूची लागण चाचणीत दिसली नाही, असा रिपोर्ट मला आणून दाखवला आहे. १७४ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख