पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होती. त्यामुळे येणारी मानहानी आणि झाल्या प्रकाराची मानहानीही खूप त्रासदायक ठरेल ही काळजी होती. अर्थात याच्या आधी व आत्ताही समलिंगी असण्याची लाज नव्हती. पण या प्रकारानं खूप भीती वाटू लागली होती. कायदयाने दोन पुरुषांचे संबंध अनैसर्गिक, बेकायदेशीर मानलेत, मग माझ्या मित्राचे आणि माझे संबंध आणि माझ्यावर झालेला प्रकार साराच 'अनैसर्गिक' आणि 'बेकायदेशीर' होता. कायदयाकडे दाद/न्याय मिळणार का? यामुळेच फक्त कॉन्सेलरकडे जाण्याचा निर्णय घेतला. कॉन्सेलरकडे या विषयावर सविस्तर बोलण्यासाठी खूप काळ जावं लागलं. ही घटना कशी घ्यावी हेच समजत नव्हतं. मन हे सगळं स्वीकारायला तयार नव्हतं. स्वीकारल्यावर त्याला काय म्हणून आपल्या आयुष्यात स्थान दयायचं, कुठे आणि कसं मांडायचं, हे सारं 'Sex is an Art' असा दृष्टिकोन ठेवणाऱ्या मला असा विकृत सेक्स कसा घ्यायचा हेच समजत नव्हतं. कालांतरानं हा एक अपघात होता, ज्यात माझी काहीच चूक नव्हती असा दृष्टिकोन तयार केला. कोणाला तरी अपराधी ठरवून, गुन्हेगार ठरवून मी त्यांना माफ केलं, कारण त्यांना लौकिकार्थी मी शिक्षाच करू शकत नव्हतो. त्यांना शिक्षा करावी हे मनात ठेवणं म्हणजे, आपणही कधीतरी त्यामुळे 'बदला' घेणारे होऊ शकतो. टोकाचा राग मनात खदखदत होता. माझ्या तथाकथित मित्राला बदडून काढावंसं वाटत होतं, जे असा प्रकार करतात त्यांचं लिंग छाटून टाकायला पाहिजे, असे टोकाचे हिंसक विचार मनात येत होते. पण मग त्यांच्यात आणि माझ्यात फरकच उरणार नाही, या विचारानं सावरण्याचा प्रयत्न झाला. माझ्या दृष्टीने ज्यांनी हा प्रकार केला ते दोघे आणि माझा मित्र सारखेच होते. त्यांनी शरीरावर बलात्कार केला होता, माझ्या मित्राने मनावर. ते दोघेही अनोळखी होते. माझ्या बॉयफ्रेंडचा व त्यांचा काय संबंध होता? हे सर्व का झालं? त्यामागे कोणतं कारण दडलं होतं हा उलगडा आजवर मला झाला नाही. मागची ३ वर्ष स्वतःला सावरतोय. समुपदेशकाबरोबर खूप चर्चा आणि माणुसकीवरचा विश्वास यामुळे खूप स्थिरावलोय. वाईट माणसांसारखीच चांगली माणसंही जगात असतात, या विचारानं गेलो. आज मी त्या सगळ्याला एक गृहीतकं ('हायपोथिसीस') मानतो. कारण या घटनेतून जे प्रश्न मला व्यक्ती म्हणून, समलिंगी व्यक्ती म्हणून पडले त्यातूनच मी बरंच काही शिकलो. स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. अर्थात तो दृष्टिकोन खूप सकारात्मक आहे. मात्र खूप प्रश्न अजून तसेच आहेत. कालांतराने कदाचित त्यांच्यावर काही उत्तरं मिळतीलही. तांत्रिक मर्यादेमुळे सगळचं सांगणं, लिहिणं शक्य नाही. माणुसकी, वेदना, सहानुभूती याबद्दल एक व्यापक दृष्टिकोन तयार होतोय असं वाटतंय. १४० मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख