पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एकत्र कॉन्सेलरकडे भेटायलाही टाळाटाळ करत होता. आमची मैत्री, नातं मी स्वतःहून तोडलं. शरीरावर झालेल्या यातना इतक्याच मनाच्या यातना त्रासदायक होत्या. माणूस दुसऱ्या माणसाचा विचारच करत नव्हता. विचार करत होता फक्त स्वतःचा. माझ्याबाबतीत जे घडलं ते माझ्या स्वत:च्या घरात घडलं. दोन व्यक्ती ज्या माझ्यासाठी आजहीं अज्ञातच आहेत त्यांनी बळजबरीनं घरात घुसून माझ्या डोळ्यांवर स्कार्फ बांधून अंगावर ओरखडे, सिगरेटचे चटके देऊन आळीपाळीनं माझ्यावर गुदमैथुन केला. हे सगळं चालू असताना तितकंच अश्लील बोलत राहिले. हे सगळं जवळजवळ ४५ ते ५० मिनिटं चाललं होतं. जाताना माझ्याच मोबाईलवरून माझ्या मित्राला त्यांनी त्याचा बदला घेतला असा मेसेज करून पसार झाले. मी मित्राला फोन केला तेव्हा 'ऑफिसमधून महत्त्वाच्या कामामुळे निघणं अवघड आहे' हे फोनवर सांगून माझ्या मित्राचा मोबाईल बंद झाला. त्यानंतरचे दोन-तीन तास मी एकटाच होतो. घरात सुन्न झालो होतो. त्यानंतर रात्री उशिरा आणखी एका समलिंगी मित्राला झाला प्रकार सांगितला. त्याच्यामार्फत या क्षेत्रात काम करणाऱ्या एका व्यक्तीमार्फत मी कॉन्सेलरकडे जाण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतर माझा कोणावर विश्वासच बसत नव्हता. स्वतः पुरुष असूनसुद्धा समस्त पुरुष जातीबद्दल राग, तिडीक बसली. पोलिसांकडे न जाण्याचा निर्णय याच मानसिकतेतून झाला. शेवटी जबरदस्ती करणाऱ्या व्यक्ती माणसंच आहेत, त्यांनाही त्यांच्या गरजा असणारचं, असा विचित्र विचार मनात आला. कोणावरच विश्वास ठेवावासा वाटत नव्हता. सगळ्या वाईट गोष्टी आपल्याबरोबरच का होतात? मी काय चूक केली म्हणून मला ही शिक्षा? कुणाबरोबर मैत्री करणं, त्याच्या जवळ जाणं याची एवढी मोठी आणि भयानक शिक्षा का? आणि का करावी कोणी मला शिक्षा? काय हक्क/अधिकार आहे कोणालाही? असे नानाविध प्रश्न मला त्रास देत होते. स्वत:चीच भीती वाटत होती. समलिंगी असण्याच्या पहिल्यांदाच कदाचित खूप मर्यादा जाणवत होत्या. पहिला प्रश्न हाच होता, की एका पुरुषावर आणि तेही समलिंगी म्हणवून घेणाऱ्या पुरुषावर झालेल्या जबरदस्तीची कायदा आणि इतर लोक दखल घेतील का, कारण एक अशी गैरसमजूत आहे, की समलिंगी व्यक्ती फक्त सेक्ससाठीच हपापलेल्या असतात, यांना माणसं फक्त संभोगासाठीच हवी असतात. कुठेही, कशीही. मग बळजबरीचा प्रश्न येतोच कुठे. आपण 'आऊट' होण्याची प्रचंड भीती मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १३९