पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" गोष्टींमुळे आपल्या मित्र/मैत्रिणींना संशय येऊ शकतो. लिंग नसेल तर पुरुष म्हणून वावरणाऱ्या व्यक्तीला मित्राच्या शेजारी मुतारीत उभं राहून लघवी करता येत नाही, तर मुलगी म्हणून वावरणाऱ्या व्यक्तीला पाळी येत नसेल तर मैत्रिणींना संशय येऊ शकतो. एकजण म्हणाली, “मी सॅनिटरी नॅपकीन पर्समध्ये ठेवते पण तरीही मला पाळी येत नाही याचा मैत्रिणींना संशय येईल ही मला कायम भीती असते.' सरकारी नोकरी मिळवतानाही अडचण येऊ शकते. शारीरिक तपासणी केल्यावर अशा व्यक्तीला पुरुष की स्त्री म्हणून घेणार? का अशा व्यक्तींना वैदयकीय चाचणीत बाद करणार? तसं केलं तर हा त्यांच्यावर अन्याय नाही का? आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत म्हणून येणाऱ्या एकटेपणामुळे अनेकजणांना नैराश्य येतं, अनेकांची अस्मिता ढासळते. एकजण म्हणाली, “सारखं खूप एकटं वाटतं. आपणच असे का? आपल्यासारखी एखादी मैत्रिण मिळावी म्हणून खूप शोध घेते. जिच्यापासून काही लपवायची गरज पडणार नाही, जी मला पूर्णपणे स्वीकारेल." बोलताना तिच्या डोळ्यांत पाणी आलं. अशा व्यक्तींना जोडीदार मिळणं अवघड असतं. असं वेगळेपण नसलेला जोडीदार मिळणं अवघड असतं व वेगळेपण असलेल्या जोडीदाराचा शोध कसा घ्यायचा? जिथे समाजाच्या भीतीपोटी प्रत्येकजण आपलं वेगळपण लपवतो, तिथे जोडीदार कसा शोधायचा? 'अशा व्यक्तीचं लैंगिक आकर्षण कोणाबद्दल असतं? पुरुष/स्त्री का दोन्ही?' याचं एक उत्तर नाही. काहींना पुरुषांबद्दल लैंगिक आकर्षण वाटतं, काहींना स्त्रियांबद्दल तर काहींना दोघांबद्दल. दुसरा प्रश्न मला विचारला जातो, “अशा व्यक्ती संभोग कसा करतात?" याचंही एक उत्तर नाही. त्या व्यक्तीला कोणती जननेंद्रियं आहेत, त्यांची किती वाढ झाली आहे, कोणती जननेंद्रियं किती कार्यशील आहेत याच्यावर त्यांना कोणत्या प्रकारचा संभोग करता येतो हे ठरतं. अशी वैविध्य असलेल्यांना समाजप्रवाहात आणणं, त्यांचे अधिकार मिळवण्यास मदत करणं हा एक दुर्लक्षित विषय राहिला आहे. या विषयावर काम करणाऱ्या संस्था परदेशात असल्या तरी भारतात मात्र त्यांची वानवा आहे. अनेकांना इंटरनेटचा आधार घेऊन या विषयावर काम करणाऱ्या पाश्चात्त्य संस्थांचा आधार घ्यावा लागतो. अशा संस्थांची आपल्या देशात फार मोठी गरज आहे. <

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख ११३