पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अशा परिस्थितीत लिंगाला उत्तेजना आणून संभोग करण्यासाठी लिंगात 'पॅव्हराईन' किंवा 'कॅव्हरजेक्ट'चं इंजेक्शन घ्यावं लागतं. या इंजेक्शनचा दुष्परिणाम होऊ शकतो. काही वेळा याच्यामुळे 'प्रिपिझम' होऊ शकतं. म्हणजे लिंग उत्तेजित होऊन तासन्तास झाले तरी लिंगाचा ताठरपणा जात नाही. अशा वेळी तातडीनं डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणं गरजेचं असतं. त्वरित उपचार न केल्यास लिंगाच्या पेशी मरू लागतात. मानसिक काहींच्या बाबतीत वयात आल्यानंतर काही काळ लिंगाला ताठरपणा येत असतो. हस्तमैथुन/संभोगही व्यवस्थित होतो. पण मग काही कारणानं लिंगाला ताठरपणा येईनासा होतो. अनेक वेळा लिंगाला उत्तेजना न येण्याची कारणं मानसिक असतात. म्हणजे हस्तमैथुन करताना लिंगाला उत्तेजना येते पण कोणाबरोबर संभोग करताना लिंगाला ताठरपणा येत नाही. याला परिस्थितीजन्य नपुंसकत्व म्हणतात. उदा. १. संभोगाच्या वेळी ताणामुळे, भीतीमुळे किंवा काळजीमुळे लिंगाला उत्तेजना येत नाही. उदा.२. एखादया वेळी जोडीदार आपल्या पुरुषार्थाबद्दल काही कमी-जास्त बोलली तर यामुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो. पुढच्या वेळी संभोग करताना आपण यावेळी तरी व्यवस्थित संभोग करू शकू की नाही याची काळजी वाटते व या काळजीमुळे लिंगाला ताठरपणा येण्यास अडचण होते. अशानं दरवेळी भीती वाढत राहते व त्यानी लिंगाला ताठरपणा येण्यास अडचण येते. नशा/औषधं सातत्यानं दारू/नशा घेणं, विशिष्ट आजार, औषधं यामुळे लिंगाला ताठरपणा येण्यास अडचण येऊ शकते. लिंगाला मानसिक कारणांमुळे ताठरपणा येत नाही का शारीरिक कारणांमुळे ताठरपणा येत नाही हे ओळखण्यासाठी लिंगातला रक्तदाब तपासायचं एक उपकरण वापरलं जातं. प्रत्येक पुरुषाच्या लिंगाला झोपेत अनेक वेळा ताठरपणा येतो. तो झोपलेला असल्यामुळे त्याला ते जाणवत नाही. उपकरण लिंगाला लावून एक रात्र हॉस्पिटलमध्ये झोपायचं. लिंगाला जेव्हा जेव्हा ताठरपणा येईल, तेव्हा तेव्हा हे उपकरण हा ताठरपणा रेकॉर्ड करतं. याच्यावरून रात्री लिंगाला ताठरपणा आला की नाही हे कळतं. जर रात्री लिंगाला ताठरपणा आला असेल तर नपुंसकतेचं कारण मानसिक आहे असं कळतं. ९८ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख