पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लैंगिक उत्तेजना देणारी माध्यमं/अश्लील वाङ्मय

 अश्लील गोष्टी, अश्लील फोटो असलेली मासिकं, 'ब्लू फिल्म्स्' हे सर्व अश्लील साहित्यात मोडतं. अशा मासिकांमध्ये लैंगिक विषयांवर गोष्टी असतात. त्यात लैंगिक संबंधांची सविस्तर वर्णनं असतात. विशेषतः समाजमान्य नसलेल्या नात्यांवर भर असतो. या गोष्टींबरोबरच स्त्रिया व पुरुषांचे अर्धनग्न फोटो असतात. अनेक रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टँडवर अशी मासिके विकायला ठेवलेली दिसतात. पूर्वी यांची खूप चलती होती. आजही आहे. पण हळूहळू ‘ब्ल्यू फिल्म्स्' चं प्रमाण वाढू लागलं आहे. 'ब्ल्यू फिल्म्स्' म्हणजे संभोग दाखवणारा चित्रपट. 'ब्ल्यू फिल्म्स्' अगदी सहजपणे उपलब्ध होतात. जसजसा इंटरनेटचा प्रसार होऊ लागला आहे तसतसं इंटरनेटवर 'ब्ल्यू फिल्म्स्' पाहण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे.

  करमणूक म्हणून किंवा लैंगिक उत्तेजना/सुख मिळवण्यास या वाङ्मयाचा वापर करताना या साहित्यातून लैंगिक सुखाबद्दल लोकांपर्यंत अनेक चुकीचे संदेश पोहोचतात. आपल्याकडे लैंगिक विषयावर शास्त्रोक्त माहिती असलेली पुस्तकं फार थोड्याजणांच्या हाती लागत असल्यामुळे बहुतेकवेळा तरुण/तरुणी ब्ल्यू फिल्म्समध्ये दाखवलेला संभोग व अश्लील साहित्यातील वर्णनं हेच सत्य आहे असं मानून आपली प्रणयक्रीडा त्याच मापात तोलायचा प्रयत्न करतात. अशा वाङ्मयातून लोकांच्या मनात अनेक गैरसमज निर्माण होतात. विविध न्यूनगंड निर्माण होतात. लैंगिक सुखाबद्दल अवास्तव अपेक्षा बनतात. अशाने जोडप्यात दुरावा/ताणतणाव निर्माण होतो. याबाबत काही महत्त्वाचे मुद्दे खाली नमूद केले आहेत.

स्त्रियांची प्रतिमा

 काही स्त्रीवादयांचं म्हणणं आहे की अश्लील वाङ्मय हे स्त्री फक्त एक लैंगिक उपभोगाची वस्तू आहे अशी स्त्रियांची प्रतिमा निर्माण करतं. अशा वाङ्मयात त्यांच्या भावनिक पैलूंना कुठेही स्थान मिळत नाही. 'पोर्नोग्राफी' एकांगी आहे, स्त्रियांबद्दल चुकीची प्रतिमा तयार करणारी आहे. उदा. लैंगिक साहित्यात अनेक वेळा स्त्रीच्या लैंगिक इच्छेबद्दल चुकीचे संदेश दिले जातात- 'ती नको म्हणाली तरी तिला 'ते' हवं असतं', 'ती कितीही जणांबरोबर न थकता सेक्स करू शकते' इत्यादी. म्हणून पोर्नोग्राफी' लोकांनी बघू नये

 काही पुरुषांना दोन स्त्रिया संभोग करताना बघायला आवडतात. म्हणून काही 'ब्ल्यू फिल्म्स्' मध्ये लेस्बियन संभोगाचा वापर केला जातो. अशा फिल्म्स्ले स्बियन नात्यांना कमी दर्जाचं दाखवणाऱ्या आहेत अशी काहींची धारणा आहे.

८८

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख