पान:माधवनिधन.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बलवंतराव नागनाथाची नेमणूक, बाजीराव, चिमणाजीआप्पा, अमृतराव वैगेरे मंडळी ज्यावेळी खाच्या लढाईच्यापूर्वी आनंदवल्लीहून आणून जास्त बंदोबस्ताने नानांनी शिवनेरी किल्यावर ठेविली, त्यावेळी तेथील अधिकाऱ्याच्या जागेवर त्यांनी केली होती; ह्मणजे बाजीराव नागनाथाच्या ताब्यात होता. त्यावेळी बाजीरावाचे वय सवाईमाधवरावाच्या वया इतकें किंवा त्यापेक्षा किंचित् लहान होते; त्याला आपल्या स्थितीची वारंवार आठवण होणे, त्यांत आप्पाच्या बोलण्याने जास्त भर पडून नानाबद्दल त्याच्या मनांत जास्त द्वेष उत्पन्न होऊन त्याने माधवरावाचें मन आपल्याकडे ओढून घेण्याची, व त्यामुळे आपला बंदीवास नाहींसा करण्याची खटपट करणे, या सर्व गोष्टी साहाजिक आहेत. बाजीराव आपल्याशी मोकळेपणाने वागतो, आपण पर्यायाने त्याचे नोकर असून तो आपल्याकडे येण्यास देखील चुकत नाही, यामुळे, आणि त्याच्या बायकोने त्याच्या पुढील वैभवाचें रेखाटलेल्या चित्रामुळे त्याचे मन बाजीरावाकडे वळून, माधवरावाकडे त्याची पत्रे गुप्तपणे पोहचविण्याचे काम जर त्याने पतकरले तर त्यांत कांही नवल नाही. बलवंतराव नागनाथाचे कारस्थान, चुगलखोर कोंडाजीमार्फत बाहेर पडल्यावर नानांनी त्याला दिलेली शिक्षा पाहून, माधवरावाला वाईट वाटणे, त्याने पत्रे पोहचविली ह्मणून मोठा राजद्रोहाचा त्याने गुन्हा केला नाही, आणि जर तो गुन्हेगार नाही तर त्याला एवढी भयंकर शिक्षा होणें रास्त नाही, असे माधवरावाच्या मनाने घेऊन त्याने त्याचा पक्ष घेणे आणि नानांनी त्याची शिफारस न ऐकणे, यांचा परिणाम त्या दोघांची लहानशी झडलेली चकमक होय. आपण राज्याचे मालक असून आपल्या संमतीने जी गोष्ट झाली तिच्याबद्दल विनाकारण दुसऱ्याला शिक्षा झाली असता त्याला आपल्या हातून काहीच मदत झाली नाही असे पाहन, माधवरावाला आपल्या अधिकाराचा संशय येऊन, त्याच विचाराने त्याचे डोके भणभणन गेलें, व नानाविषया त्याच्या मनांत तिरस्कार उत्पन्न झाला. एकदा एका विचाराने डोके मरल मणजे मग दुसऱ्या गोष्टीचा विचार होणे कठीण आहे. मग दसऱ्या गोष्टी नेहमी उलटच दिसू लागतात.