पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२७८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खाद्यतेलाची आयात केल्यामुळे खाद्यतेलाचा तुटवडा कायम करण्याचीच सरकारची ही करणी झाली.
 सरकारने आणखी एक घोषणा केली - बिगरबासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याची. मग, दुधाच्या भुकटीच्या निर्यातीवर बंदी घातली. काल परवा मक्याच्या निर्यातीवर बंदी घातली. १९८० साली शेतकऱ्याच्या कांद्याची निर्यात होऊ द्यायची नाही या सरकारच्या धोरणाविरुद्ध शेतकरी संघटनेचे पहिले आंदोलन झाले; उसापासून होणाऱ्या साखरेवर लेव्ही लावली जाते म्हणून उसाचे आंदोलन उभे राहिले. शेतकऱ्यावर अन्याय करणारी ही धोरणे सरकार आता पुन्हा एकदा लादते आहे. खाद्यतेलाची आयात आणि तांदूळ, मका यांच्या निर्यातीवरील बंदी ही त्याची उदाहरणे आहेत.
 अजून एक शेतकरीविरोधी धोरण सरकार राबवीत आहेत. सरकारने शेतीमालाच्या वायदेबाजारवर बंदी घातली आहे. निदान बारा शेतीमालाच्या वस्तू वायदेबाजारात जाऊ शकत नाही. त्याशिवाय वायदेबाजारातील एक लाख रुपयांच्या उलाढालीवर १७ रुपयांचा कर वित्तमंत्र्यांनी लावला आहे. त्यामुळे, वायदेबाजार सध्या बंदच आहे. सध्या देशातील सगळ्यात तुटवड्याची गोष्ट म्हणजे वीज. या विजेच्या वायदेबाजाराला सरकारने परवानगी दिली आहे. पण, शेतीमालाच्या - गव्हाच्या वायदेबाजाराला मात्र सरकारने बंदी घातली आहे. वायदेबाजार कसा चालतो, त्याचे फायदे कोणते, त्यात धोका कितपत आहे या गोष्टी सविस्तरपणे समजावून द्यायचे तर एक प्रबंधच लिहावा लागेल; पण मुद्द्याचे सांगायचे तर आपण शेतकऱ्याला बाजारपेठेचे स्वातंत्र्य हवे म्हणतो त्यादृष्टीने वायदेबाजाराइतकी स्वतंत्र बाजारपेठ कोणतीही नाही. तेथे कोणीही व्यापारी खरीदण्याकरिता जाऊ शकतो आणि कोणीही शेतकरी आपला माल विकण्याकरिता जाऊ शकतो. त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असते की हंगामात शेतीमालाची किंमत उतरते, दोन-तीन महिन्यांनी किमती वाढू लागतात. दोन तीन महिन्यांनी वाढणाऱ्या किमती आपल्याला मिळाल्या तर फार चांगले होईल असे सगळ्याच शेतकऱ्यांना वाटत असते; पण शेतकऱ्याकडे थांबायची ताकद नसते. त्याला हेही माहीत असते की हंगामात आपल्याकडे ज्वारीला, सोयाबीनला भाव कमी असतो; पण मध्यप्रदेशात ते घेऊन गेलो तर चांगला भाव मिळू शकतो; पण येथून माल तिकडे नेऊन विकावा इतकी ताकद शेतकऱ्याकडे नसते. संगणकाच्या आधाराने चालणारा वायदेबाजार शेतकऱ्याला थांबण्याचा खर्च न करता किंवा वाहतुकीचा खर्च न करता नंतरच्या काळी किंवा दूरच्या ठिकाणी मिळणारी जास्तीची किंमत मिळवून देतो. स्थल

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २७८