पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२७९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि काळ यांची बंधने उल्लंघून शेतकऱ्याला चांगला भाव मिळवून देणारी यंत्रणा म्हणजे वायदेबाजार. अनेक डाव्या म्हणजे कम्युनिस्ट लोकांनी वायदेबाजार म्हणजे सट्टा जुगाराचा अड्डा आहे. असा अपप्रचार केला आहे. वायदेबाजारामुळे महागाई वाढते आहे असाही त्यांनी प्रचार केला आहे. याचा अभ्यास करण्यासाठी सरकारने जी समिती नेमली होती त्या समितीचा मीही एक सदस्य होतो. या समितीने स्पष्ट अहवाल दिला आहे की, किंमत वाढ आणि वायदेबाजाराचे कार्य यांचा काहीही संबंध नाही आणि तरीसुद्धा केवळ शेतकऱ्याला बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळू नये या हेतूने वायदेबाजारावर बंदी आणण्याचे काम सरकारने केले.
 म्हणजे, शेतकऱ्याचे दोन्ही हात बांधून ठेवलेले आहेत. शेतकऱ्यावरील कर्ज अजून फिटलेले नाही. तरी या शेतकऱ्याचे बाजारपेठेचे स्वातंत्र्य काढून घेण्याकरिता सरकारने निर्यातीवर बंदी घातली, शेतीमालाची खुली आयात सुरू केली आणि वायदेबाजारावर बंदी घातली. कधी नव्हे इतके, नेहरूंच्या काळातसुद्धा काँग्रेस सरकार जितके शेतकरीद्वेष्टे नव्हते, तितके शेतकरीद्वेष्टे आजचे सोनिया गांधींचे सरकार बनले आहे.
 पेट्रोल टंचाई
 सगळ्या देशामध्ये महागाई वाढली त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे जगामध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेल यासारख्या पेट्रोलियम पदार्थांचा तुटवडा आहे. कारण सगळ्या खाणी अरब देशांच्या हाती आहेत. अरब देशांचे संपुआ सरकारने कितीही कौतुक केले तरी ते काही हिंदुस्थानचे मित्र नाहीत हे सगळ्यांना माहीत आहे. सर्व पेट्रोलियम पदार्थ ज्यातून तयार होतात त्या कच्च्या तेलाच्या (Crude oil) किमती वाढता वाढता शेवटी अशा वाढल्या की सरकारला एक दिवस जाहीर करायला लागले की हे ओझे आम्ही घेऊ शकत नाही. ग्राहकांनी या ओझ्यातील काही भाग आता उचलायला पाहिजे. म्हणून पेट्रोलच्या किमती लिटरमागे ५० वरून ५५ रुपये झाल्या. डिझेलची, गॅसची किंमतही वाढवली. यावेळी मला एका पंतप्रधानांची आठवण झाली. देशाच्या सगळ्या पंतप्रधानांपैकी मला ज्या एकमेव पंतप्रधानांबद्दल आदर आहे ते म्हणजे स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री. त्यांनी पाकिस्तानविरुद्ध लढाई सुरू करण्याआधी 'जय जवान, जय किसान' अशी घोषणा केली, हिंदुस्थानात हरितक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आणि देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी केले. एवढेच नव्हे तर, अन्नधान्याचा तुटवडा आहे म्हटल्यावर लाल बहादूर शास्त्रींनी देशातील सगळ्या नागरिकांना आवाहन केले, की आठवड्यातून एक जेवण तुम्ही सोडून द्या; तुमच्या पोटाला

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २७९