पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२३२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

देशातील शेतकऱ्यांना शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या तुलनेने काय भाव मिळतात? जपानचे उत्तर होते की १०० रुपये उत्पादनखर्च असेल तर आमच्या शेतकऱ्याला १९० रुपये मिळतात. युरोपमधील देशांनी सांगितले की १०० रुपये उत्पादनखर्च असेल तर आमच्या शेतकऱ्याला १६५ रुपये मिळतात आणि अमेरिकेमध्ये १३५ मिळतात. १९८६ साली त्यावेळचे व्यापारमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या सहीने हिंदुस्थान सरकारने जागतिक व्यापार संस्थेला उत्तर दिले की आमच्या शेतकऱ्याचा उत्पादनखर्च १७२ रुपये असेल तर त्याला १०० रुपयेच मिळावेत त्यापेक्षा जास्त मिळता कामा नये असे आमचे धोरण आहे. सगळ्या देशांमध्ये, शेतकऱ्यांना फायदा व्हावा असे धोरण आणि आमच्याकडे मात्र त्याचे नुकसान व्हावे असे धोरण. मी त्याला पहिल्यांदा उणे सबसिडी हा शब्द वापरला. मोठमोठे अर्थशास्त्री तेव्हा म्हणत हे 'उणे सबसिडी' म्हणजे काय ते आम्हाला समजत नाही. मी म्हटले, तुम्हाला समजणारच नाही. पुण्याचे अर्थशास्त्रज्ञ वि. म. दांडेकरांनी मला एकदा विचारले होते की, 'हे तुम्ही शेतकऱ्यांना कसे काय समजावून सांगता?' मी त्यांना म्हटले की हे शेतकऱ्यांनाच समजण्यासारखे आहे, बाकीच्यांना समजणे अवघड आहे. मी त्यांना माझा शेतकरी म्हणून अनुभव सांगितला.
 मी शेतकरी झाल्यानंतर पहिले पीक खिरा काकडीचे घेतले. पहिल्यांदा मुंबईला काकडी पाठवली – दोन-तीन पोती असतील. काही दिवसांनी माझ्या अडत्याचे पत्र आले की आम्ही तुमची काकडी विकली, खर्चवेच वजा जाता उरलेले १८३ रुपये मनिऑर्डरने पाठवीत आहोत. शेतकरी म्हणून पहिली कमाई झाली म्हणून मोठा आनंद झाला. दुसऱ्या वेळी असेच काही दीडदोनशे रुपये आले आणि तिसऱ्या वेळी अडत्याचे पत्र आले की आम्ही मोठ्या कसोशीने तुमचा माल विकला; पण जी काही रक्कम हाती आली त्यातून वाहतूक आणि हमालीचाही खर्च निघत नसल्यामुळे आपणच आम्हाला १२३ रुपये पाठवून द्यावे. ही उलटी पट्टी. उलटी पट्टी म्हणजे काय हे सगळ्या शेतकऱ्यांना व्यवस्थित समजते. मी दांडेकरांना सांगितले की ज्यांना शेतीमालाची उलटी पट्टी घ्यावी लागते त्यांना 'उणे सबसिडी' म्हणजे काय हे समजण्यात अडचण येत नाही.
 'उणे सबसिडी' म्हणजे काय हे समजण्यात अडचण येते ती 'शरद पवारां'ना आणि 'आर.आर. पाटलां'ना. हाँगकाँगला जागतिक व्यापार संस्थेच्या मंत्रिपरिषदेची बैठक होणार होती तेव्हा मी तीनतीनदा विचारले शरद पवारांना की हिंदुस्थानच्या शेतकऱ्याला सध्या उणे सबसिडी किती आहे ते सांगा. त्यांनी तीनही वेळा तो विषय टाळला. शेवटी, व्यापारमंत्री कमलनाथ यांनी हाँगकाँगला जाण्याआधी

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २३२