पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२२४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेतकरी संघटनेने केले. ते करताना माझ्या हातून काही चुका झाल्या असतील; जो निर्णय घेतो त्याच्याकडून चुका होणे साहजिकच आहे. त्या चुकांमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षेइतकी शेतकरी संघटनेची प्रगती झाली नसेल कदाचित; माझ्या चुकांमुळे, कदाचित, तुमच्यापैकी काही लोकांना जिल्हा परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये जाण्याची अपेक्षित संधी मिळाली नसेल. त्याबद्दल खेद व्यक्त करून मी सांगू इच्छितो की, संघटनेच्या आयुष्यात २५ वर्षे म्हणजे काही मोठा काळ नाही. शेतकरी संघटना २५ वर्षांची झाली, २५ वर्षांचा माणूस तरुण असतो; पण संघटना हे बाळ आहे. त्याच्या हातून जर काही चूक झाली असेल तर ती पोटात घाला आणि त्या बाळाला ममतेने आणि प्रेमाने वाढवा. कारण, हे अत्यंत कठीण अवस्थेत जन्मलेले बाळच, तुरुंगात जन्मलेल्या बाळकृष्णाने मोठा झाल्यावर जसे कालियामर्दन केले तसेच, मोठे झाल्यावर सर्व शेतकरी समाजाला छळणाऱ्या सरकारशाहीरूपी कालियाचे मर्दन करून त्याच्या छळातून तुमची सुटका करणार आहे.

(१० डिसेंबर २००५ - रौप्यमहोत्सव मेळावा परभणी)
(शेतकरी संघटक ६ जानेवारी २००६)

◼◼

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २२४