पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२००

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कारखानदारांना वीज मिळणार नाही असं म्हणण्याची हिंमत मुख्यमंत्री करीत नाहीत. कारण, तसं म्हटलं तर त्यांची खुर्ची लगेच डळमळायला लागेल. सरकार फक्त शेतकऱ्यापुढेच शौर्य दाखवतं. सरकार संरक्षण देऊ शकत नाही, पैसे देऊ शकत नाही, नोकरदारांचे पगारही देऊ शकत नाही, तुम्हाला शेताला पाणी द्यायला आणि घरामध्ये दिवा लावायला वीज देऊ शकत नाही, प्यायला पाणी देऊ शकत नाही; हे सरकार आहे काय कामाचं? या सरकारला जर वळणावर आणायचं असेल आणि देश वाचवायचा असेल तर यावेळी आवश्यक तर नांगर मोडून तलवार करणे अपरिहार्य आहे. नांगर तोडून तलवार केली तरच देश वाचतो आणि शेतकरी वाचतो. नाहीतर काही धडगत नाही.
 ही घोषणा आपण या सांगलीच्या या मेळाव्यात करीत आहोत हे एका अर्थाने यथार्थच आहे. सांगली साताऱ्याच्या या परिसराला एक मोठा लढाईचा इतिहास आहे. यापुढे आपल्याला आपल्या लढाईत आदर्श ठेवावा लागेल तो क्रांतिसिंह नाना पाटलांचा ठेवावा लागेल. इंग्रज राजवटीच्या विरोधात नाना पाटलांनी प्रतिसरकार स्थापन केले आणि इंग्रज सरकारच्या अधिकाऱ्यांना पकडून त्यांच्या पायांना पत्र्या मारीत असत. पुन्हा एकदा मंत्र्यांच्या, आमदारांच्या आणि नोकरदारांच्या पायाला पत्र्या ठोकायची तयारी कराल तरच तुम्ही जगू शकता आणि देशाला जगवू शकता.
 गेल्या पंचवीस वर्षांच्या शेतकरी आंदोलनाच्या शेवटी आपल्या या पायरीला येणे भाग पडते आहे. हा लढाईचा उपाय सांगताना तुम्ही लढा, मी कपडे सांभाळतो अशी भूमिका मी घेणार नाही - आजपर्यंत कधीही घेतली नाही. गेल्या वीस वर्षात चोवीस वेळा शेतकरी आंदोलनात तुरुंगात गेलो, शेकडो खटले माझ्यावर लावले गेले. यापुढच्या कार्यक्रमात तुम्ही काही केले आणि तुमच्यावर खटला लागला तर तुम्ही आरोपी असाल; पण तुमच्याबरोबर आरोपी नंबर एक मी असणार आहे. यापुढे माघार घेणे नाही. कारण माघार घेणे म्हणजे गेल्या पंचवीस वर्षात शेतकरी संघटनेने जे जे कमावलं ते फुकट घालवणं आहे आणि तुरुंगात जाण्यात वाईट काय आहे? ज्या घरात प्यायला पाणी नाही, दिवा लावायला वीज नाही, उकडायला लागलं तर पंखा चालवायला वीज नाही आणि कर्जवसुलीकरिता देणेकरी सारखे येत असतात त्या घरात पोराला काय खाऊ घालावं, त्याची फी कशी द्यावी, पास झाला तर कोणत्या कॉलेजात ॲडमिशन घ्यावी, त्यासाठी डोनेशनची रक्कम कोठून आणावी एवढ्या चिंता बाळगत बसण्यापेक्षा, सर्व चिंतांतून मुक्ती मिळविण्याचा एक मोक्षमार्ग भगवान कृष्णाचा जन्म जेथे झाला त्या तुरुंगातून जातो, तेथे जायची तयारी ठेवायला काय हरकत

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २००