पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१९९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि मग सारखी तक्रार करीत राहायचं यात काही पुरुषार्थ नाही. आता रडत बसून उपयोग नाही.
 शेतकरी संघटनेने आतापर्यंत दिलेला धडा काय आहे?
 सरकार आणि सहकार हे शेतकऱ्यांना लुटण्याकरिताच आहेत. पुढाऱ्याला यात काय आनंद आहे? हा प्रश्न शेळीने कसायाला विचारण्यासारखंच आहे की, "बाबा, तुला खायला वांगी आहेत, बटाटे आहेत,..... मग तू माझी मान का कापतोस?" उत्तर सरळ आहे, 'तो त्याचा धंदा आहे' तो शेळीला एरवी चांगलंचुंगलं गवत खायला देतो, पण वेळ आली म्हणजे मान कापतोच. तसंच, शेतकऱ्याची मान कापल्याशिवाय पुढाऱ्याला आनंद वाटणारच नाही; त्याचा तो व्यवसाय आहे म्हणून तो तुमची मान कापणार आहे. तो तुम्हाला पाणी आणून देतो, काही वेळा कर्ज मिळवून देतो, कारखानाही काढून देतो; थोडं फार भलं करतो. पण ते सर्व कसायानं शेळीला चारापाणी करण्यासारखं आहे. कसाई शेळीला चारापाणी देतो म्हणजे त्याचं तिच्यावर प्रेम आहे असं नाही; त्यात त्याचा व्यावसायिक हिशोब असतो. कापल्यानंतर भरपूर मटन मिळायला पाहिजे म्हणून तो चारापाणी करतो हे कधी विसरू नका.
 पाण्याचा प्रश्न तयार झाला, विजेचा प्रश्न तयार झाला, उसाचा प्रश्न तयार झाला; पण हे सर्व प्रश्न तयार करणाऱ्या सरकारचं डोकं का फिरलं आहे हा खरा प्रश्न आहे. सरकारच्या हाती आता पैसा शिल्लक नाही. लोकांशी संपर्क साधायचं त्यांचं मुख्य साधन म्हणजे पोलिस. पोलिसांमुळे सरकारने लोकांचे प्राण वाचवायचे, त्यांच्या घरादाराचे रक्षण करायचे. आता पोलिस अधिकाऱ्यांच्या भरतीत लाखांनी रुपयांची रूढी पडल्यापासून पोलिस खातं असं झालं आहे की ते काही कोणाचं संरक्षण करीत नाहीत, दिवसाढवळ्या खून पडले तरी तिकडे काही तातडीने बघायला जात नाहीत. ज्या नोकरदार पोलिसांवर भिस्त तेच असे झाल्यावर सरकारचं डोकं फिरणारच.
 मागच्या कापूसचुकारा आंदोलनाच्या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, 'सरकारकडे शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत तर काय करावे?' मी म्हटले, 'शेतकऱ्याला १०० टक्के किंमत द्यायला पैसे नाही हे ऐकून फार वाईट वाटले. तुम्ही १०० ऐवजी ८० टक्के देणार म्हणता तर मी मान्य करायला तयार आहे. पण एक अट आहे. पुढच्या महिन्यापासून सगळ्या सरकारी नोकरांचे, आमदारांचे, मंत्र्यांचे पगारसुद्धा फक्त ८० टक्के झाले पाहिजेत.'
 शेतकऱ्याला काय ती फक्त कपात लावायची, अनुशेष आहे म्हणून शेतकऱ्याला नवीन वीज कनेक्शन द्यायचे नाही, पण अनुशेष आहे म्हणून कोल्हापुरातल्या

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १९९