पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१७१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हिस्सा असलेला देश सर्वांवर हुकुमत गाजवून सांगू शकतो की आम्ही सांगू ते सर्वांनी ऐकलेच पाहिजे आणि जागतिक व्यापार संघटना उदयाला येण्याआधी अमेरिका सुपर-३०१ च्या रूपाने तशी वागतही होती. अशी ही प्रबळ अमेरिका मुकाट्याने कबूल करते की जागतिक व्यापार संघटनेमध्ये आम्ही इतर सर्व राष्ट्रांच्या बरोबरीने बसतो, ५१% हिस्सा असलेल्या अमेरिकेला मत एक आणि ०.१% हिस्सा असलेल्या हिंदुस्थानलाही मत एक. हा मोठा चमत्कार जागतिक व्यापार संघटनेच्या निमित्ताने घडला आहे. इस्लामच्या शिकवणुकीमुळे नमाजाला बसताना अमीर आणि गरीब यांनी एकाच सतरंजीवर बसावे तसा हा प्रकार आहे. वाटाघाटीत आणि निर्णय प्रक्रियेत श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव न करता सर्वच देशांना समान अधिकार ही एकच गोष्ट जागतिक व्यापार संघटनेचा करार स्वीकारायला, विशेषत: जागतिक व्यापारातील हिश्श्याच्या संदर्भात गरीब राष्ट्रांच्या दृष्टीने पुरेशी आहे; पण सुरुवातीला आपल्या देशाने ते कबूल केले नाही. तेथे वाद व्हायला लागले आणि करारावर सह्या व्हायला उशीर व्हायला लागला. तेवढ्यात अमेरिकेसारख्या प्रगत श्रीमंत राष्ट्रांनी कराराच्या मसुद्यात काही नवीन अटी घालायला सुरुवात केली. उदाहरणार्थ, ज्या देशांमध्ये बालमजूर आहेत त्यांच्याशी आम्ही व्यापार करणार नाही, ज्या देशामध्ये मजुरांना योग्य असे कायदे नाहीत त्यांच्याशी आम्ही व्यापार करणार नाही. ज्या देशात पर्यावरणाची काळजी घेतली जात नाही त्यांच्याशी आम्ही व्यापार करणार नाही....म्हणजे, आपल्याकडील 'स्वामी अग्निवेश' जी भाषा बोलत होते ती भाषा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बोलू लागले आणि आपले त्यात मोठे नुकसान झाले. तरीही चांगला व्यापार म्हणजे काय, चांगले व्यापारी म्हणजे काय हे जगाच्या इतिहासात प्रथमच जागतिक पातळीवर ठरले.
 शेतकरी संघटनेचा उदय
 जागतिक व्यापारातील हिंदुस्थानचे स्थान याबद्दलच्या या चर्चेत आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. इंग्रज इथे असताना शेतकऱ्याचे शोषण होत होते, शेतकरी गरीब होत होता. जोतिबा फुल्यांनी ही वस्तुस्थिती कायम प्रकाशात ठेवली. एक दिवस इंग्रज निघून गेले, सुरुवातीला आपण अन्नधान्यासाठी जगावर अवलंबून होतो, पण दहावीस वर्षांत हे परावलंबन संपले. पंजाब हरियानातील बहाद्दर शेतकरी एकरी वीस वीस क्विंटल गहू पिकवू लागला, आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झालो आणि तरीसुद्धा शेतकऱ्याच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा काही हटला नाही, शेतकऱ्याची गरिबी काही हटली नाही. जास्त पिकवावे तर कर्जाचा बोजा वाढतो, गरिबीही वाढते, उत्पन्न कमी

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १७१