पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१७२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

येते असा अनुभव सतत येऊ लागल्यानंतर शेतकरी संघटनेचा उदय झाला आणि शेतकरी संघटनेने पहिल्या प्रथम विचार मांडला की, 'आम्हाला सरकारकडून सूट नको, सबसिडी नको, काही नको. सरकार आम्हाला कोण देणारे? आमच्या शेतात एका दाण्याचे शंभर दाणे होतात; सरकारच्या कारखान्यात एक किलो लोखंडात कणभरही वाढ होत नाही. मग ते कसे काय शेतकऱ्यांना मदत करणार? सरकारने फक्त शेतकऱ्यांच्या कारभारात हात घालायचे सोडून द्यावे.' शेतकरी संघटनेने घोषणा दिली – 'सूटसबसिडीचे नाही काम, आम्हाला हवे घामाचे दाम.' ही घोषणा जरी शेतकरी संघटनेची असली तरी तिच्या मागची प्रेरणा आहे महात्मा गांधींची. ते म्हणाले होते, "गरिबांकरिता 'हे करू, ते करू' असे सगळेजण म्हणतात; पण गरिबाच्या पाठीवरून उतरायला कोणी तयार होत नाही. बाकी काही करण्याच्या गप्पा मारण्यापेक्षा गरिबांच्या पाठीवरून उतरा, त्याला मोकळेपणाने काम करू द्या. म्हणजे मग, गरिबी झटकन पळून जाईल." 'गरिबी हटाव, गरिबी हटाव' म्हणून निवडणुका जिंकून गरिबी हटत नाही. गरिबी हटवायचा मार्ग सोपा आहे. 'गरिबी टिकावी आणि वाढावी म्हणून सरकार जे प्रयत्न करते ते सोडून दिले तर गरिबी आपोआप नाहीशी होईल.
 सरकार कमी तितके नामी
 शेतकरी संघटनेने गेली वीस बावीस वर्षे स्वातंत्र्याची मागणी सातत्याने केली. इतर सगळ्यांनी शेतकरी संघटनेला विरोध केला. पण मनुष्याच्या विकासाचा इतिहास सगळा आपल्या बाजूने आहे; काठीने जमीन उकरून शेती करणाऱ्या बाईपासून हिटलरच्या शाख्तपर्यंतच्या इतिहासाचा आपण जो आढावा घेतला त्यावरून हे स्पष्ट होते. म्हणून आता तुमचा आणि माझा सोन्याचा दिवस उगवतो आहे. आता संपूर्ण जगात सिद्ध झाले आहे की सरकार जिथे जिथे हात घालते त्या त्या गोष्टीचे वाटोळे झाल्याखेरीज राहत नाही. सरकारने एखादी गोष्ट करतो म्हटले आणि चांगले झाले असे कधीच होत नाही. खरे तर जनतेच्या मनात भावना असते की सरकारकडे काही जबाबदारी सोपवली की काही तरी चांगले होईल. उदाहरणार्थ, समजा शेतामध्ये काम करणाऱ्या शेतमजुराला योग्य मजुरी मिळत नाही, किमान वेतनसुद्धा मिळत नाही. मग काही मंडळी सरकारला सल्ला देतात की या कामावर देखरेख करणारा एक इन्स्पेक्टर नेमा. मग, नेमलेला इन्स्पेक्टर शेतमालकाकडे जातो, तिथे बसून चहापाणी घेतो, मजुरांकडून थोडे पैसे खातो, मालकाकडूनही थोडे पैसे खातो; मजुरी वाढण्याचा काही संबंधच नाही. दोन वर्षांनी त्यांच्या लक्षात येते की इन्स्पेक्टर नेमूनही परिस्थितीत काही फरक पडत नाही. मग, सूचना येते की एक कमिशनर नेमा. त्यानेही भागत नाही

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १७२