पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१६९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

इंग्लंड वगैरे दोस्त राष्ट्रे. त्यामध्ये जर्मनीचा पराभव झाला. पहिल्यांदा युद्धामध्ये रणगाडे वापरले गेले, मशीनगन्स वापरल्या गेल्या. लाखो लोक मेले, शहरे उद्ध्वस्त झाली, बेचिराख झाली. जर्मनी शरण आला, युद्ध संपले आणि तहाच्या वाटाघाटी चालू झाल्या. जेत्यांच्या मनामध्ये प्रचंड राग होता. यांच्यामुळे आपली शहरे उद्ध्वस्त झाली, प्रचंड नुकसान झाले; यांना अशी शिक्षा तहाच्या अटींत दिली पाहिजे की जर्मन लोकांची पुन्हा युद्ध करण्याची हिंमत होता कामा नये. त्यासाठी दोस्त राष्ट्रांनी ठरविले की, जर्मनीवर अशी खंडणी लादायची की पुन्हा सैन्य उभे करण्याची ताकद त्यांच्यात राहू नये. खंडणी लादली एवढेच नव्हे तर त्यापलीकडे जाऊन जर्मनीमधील कोळशाच्या आणि लोखंडाच्या खाणी असलेले प्रांत फ्रान्सने, इंग्लंडने बळकावून घेतले; त्यांच्यातील जे जे काही चांगले होते ते बळकावून घेतले आणि शिवाय वार्षिक खंडणी लादली. म्हणजे, जर्मनीची स्थिती हिंदुस्थानातील शेतकऱ्यांसारखीच झाली. नाइलाजाने का होईना, खंडणी द्यायची म्हटले तरी द्यायची कशी? असा प्रश्न जर्मनीसमोर उभा राहिला. खंडणी द्यायची तर आपल्या चलनात द्यायची नसते, ज्याला खंडणी द्यायची त्याच्या चलनात द्यायची असते. जर्मनीपुढे प्रश्न उभा राहिला की जेत्यांच्या चलनात रक्कम मिळवायची कशी? परकीय चलन मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्या देशांशी निर्यात व्यापार करणे. तहामध्ये दोस्त राष्ट्रांनी जर्मनीकडे जे जे काही चांगले होते ते बळकावून घेतले होते, त्यामुळे जर्मनीकडे विकण्याजोगे असे काही राहिलेच नाही. या कोंडीमुळे जर्मनीमध्ये हिटलरचा उदय झाला. हिटलरचा वित्तमंत्री डॉ. शाख्त याने जर्मनीला या कोंडीतून बाहेर काढण्याची जबाबदारी घेतली. त्याने आधी हुकूम काढला की दुसऱ्या कोणत्याही देशाचा माल आम्ही जर्मनीत येऊ देणार नाही. सर्व आयातीवर बंदी घालण्यामागे डॉ. शाख्त याची कल्पना अशी होती की या आयातबंदीमुळे, आपण निर्यात करून मिळविलेले परकीय चलन आपल्याच हाती राहील. असे झाल्यानंतर बाकीचे देश स्वस्थ थोडेच राहणार आहेत? जर्मनीने आयातबंदी केल्याबरोबर फ्रान्स, इटली, स्पेन इत्यादी सगळ्याच देशांनी आयातबंदी केली. परिणामी, जगातला व्यापार बंद झाला. जोपर्यंत शेजारणीशेजारणी निदान दही, साखर वगैरेची देवघेव करीत असतात तोपर्यंत त्यांच्यात भांडण होत नाही; पण, एकमेकींमध्ये उसनेपासने करण्याचे व्यवहारसुद्धा होत नसले तर अगदी किरकोळ गोष्टींवरूनही शिवीगाळ होते. तशीच, सगळ्याच देशांनी केलेल्या आयातबंदीमुळे जगभरचा व्यापार थांबल्याने जगभर शिवीगाळ सुरू झाली. जर्मनी एका बाजूला, फ्रान्स, इंग्लंड इत्यादी दोस्त राष्ट्रे दुसऱ्या बाजूला यांच्यातील ताणतणाव वाढत गेले आणि

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १६९