पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१६८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आजूबाजूला दुसरे काही लोक होते ज्यांना अजून शेतीचे ज्ञान अवगत झाले नव्हते, ते यांच्याकडे अचंब्याने पाहत होते. 'हे काय चमत्कार करीत आहेत? आयती शिकार चालून आल्यावर जितकी मौज होत नाही तितकी मौज या शेतकऱ्यांची दिसते आहे.' त्यांनी असा विचार केला की यांच्या खळ्यावर धान्य साठले की आपण दोनचार जणांनी दांडुके घेऊन जायचे आणि धान्य घेऊन यायचे, धान्य घेताना शेतकऱ्यांनी जर विरोध केला तर दांडुक्यांनी त्यांना हाणायचे आणि धान्य काढून घेऊन यायचे. धान्याची रास खळ्यात उभी करण्याचे शेतकऱ्याचे काम चारसहा महिन्यांचे आणि ते हस्तगत करण्याचे या लुटारू दरोडेखोरांचे काम चार तासांचे.
 काम इतके सोपे झाले म्हणजे त्या कामाची मागणी खूप वाढते. दुधासाठी गाईम्हशी ठेवल्या तर पोराच्या ओठाला लावण्याइतपतही दूध घरी उरत नाही. त्यामुळे आम्हाला गाईम्हशी द्या असे कोणी म्हणत नाहीत. पण दुधाची सोसायटी काढली म्हणजे एका वर्षात माडी होते त्यामुळे जो तो दूध सोसायटी काढण्याची धडपड करतो. तसेच, त्याकाळीही शेती करण्याचा प्रयत्न करणारांवर, शेतीतील पीक लुटणाऱ्या लुटारूंचे राज्य सुरू झाले.
 हा इतिहास आहे. हे लुटारू पहिल्यांदा दोन-चार-पाच होते, पाचाचे पन्नास झाले, असे वाढता वाढता लुटारूंच्या असे लक्षात आले की हे जर का असेच चालत राहिले तर शेती कोणी करणारच नाही. मग त्यांनी नियम तयार केले. कुणब्याच्या पोरांनी शेतीच केली पाहिजे, दुसरे काही करता कामा नये, वगैरे वगैरे नियम तयार झाले. म्हणजे जातीची भिंत घालून टाकली. अशा भिंतीभिंतीत शेतकऱ्यांना कोंडले. शेतकऱ्यांनी कोणते बियाणे वापरायचे ते त्यांनी नाही ठरवायचे, जे पणजोबांनी वापरले तेच वापरायचे, आपली अक्कल वापरायची नाही. अशा तऱ्हेने शेतकरी गुलामीत पडला. कारण, जसे पोपट गोड गोड बोलून करमणूक करतो म्हणून त्याला पिंजऱ्यात कोंडतात, कावळ्याला कोणी पिंजऱ्यात ठेवीत नाही तसेच शेतकरी एका दाण्याचे शंभर दाणे करतो म्हणून त्याला गुलामीत ठेवण्यात आले.
 ही जुनी कहाणी आहे.
 आज या हजारो वर्षांच्या कहाणीचा शेवट येतो आहे. तो शेवट समजावून सांगण्याआधी मी आणखी एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट किमान ऐशी वर्षे जुनी आहे.
 व्यापारबंदी - युद्धाचे मूळ
 पहिले महायुद्ध झाले. एका बाजूला जर्मनी आणि दुसऱ्या बाजूला फ्रान्स,

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १६८