पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१०७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 खोट्यांना परवानगी
 शिवसेनेने पक्ष म्हणून मान्यतेसाठी व निवडणूक चिन्हासाठी अर्ज केला. त्यात त्यांनी लिहून दिले की आम्ही निर्धार्मिक आहोत. बाहेर वाघाचा मुखवटा घालून हर क्षणी 'गर्व से कहो, हम हिंदू हैं ।' म्हणून गरजणारे हे लोक निवडणूक चिन्ह मिळावं म्हणून आम्हीसुद्धा निर्धार्मिक आहोत असं लिहून देतात. दुसऱ्याच दिवशी पुन्हा वाघाचं कातडं पांघरून पुन्हा पहिल्यासारखंच गरजायला लागतात आणि बाळासाहेब ठाकरे उघडपणे सांगतात की आम्हाला अशी नाटकं करावीच लागतात; आम्ही खोटं बोललो नसतो तर आम्हाला चिन्ह मिळालं नसतं. म्हणजे, घटनेवर विश्वास ठेवणं बंधनकारक आहे म्हणून आम्ही खोटं बोललो आणि निवडणूक चिन्ह पदरात पाडून घेतलं असं बाळासाहेब ठाकरेंनी कबूल केलं. त्यांनी कबूल केलं पण इतरांनी असं कधी कबूल केलं नाही.
 कम्युनिस्टांनी जुन्या काळीसुद्धा आपला लोकशाहीवर विश्वास असल्याची खोटीच शपथ घेऊन चिन्हं मिळविली. भारतीय जनता पार्टीने, बब्बर खालसाने 'आम्ही निर्धार्मिक आहोत' अशी शपथ घेऊन चिन्हं मिळवली आहेत आणि आता खुल्या अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करणारी, मनमोहनसिंग आणि नरसिंहराव यांची काँग्रेस आणि त्यांचे उमेदवार 'आम्ही समाजवादी आहोत' अशी शपथ घेऊन निवडणूक लढतात. मुख्य निवडणूक आयुक्त शेषणसाहेब 'सर्व पक्षांचे उमेदवार निवडणुकांचा खोटा खर्च दाखवतात' असा आक्षेप घेतात; पण हे सर्वजण घटनेवरील विश्वासासंबंधी खोटी शपथ घेऊन निवडणुका लढवतात हे मोठं सत्य शेषणसाहेब सांगत नाहीत. आता सरकार एक पाऊल पुढं चाललं आहे. चालू अधिवेशनात निवडणूकप्रणालीसुधारासंबंधी एक बिल सरकारनं लोकसभेसमोर ठेवलं आहे. त्यात एक अशी तरतूद आहे की एखाद्या पक्षाने जर नोंदणी किंवा चिन्ह-मागणीच्या वेळी शपथ घेतली असेल आणि नंतर असं लक्षात आलं की त्या पक्षाची लोकशाहीवर, समाजवादावर किंवा निर्धार्मिकतेवर निष्ठा नाही तर त्या पक्षाची नोंदणी रद्द करून निवडणूक चिन्ह परत घेता येईल. ही दुरुस्ती मान्य झाली तरी घटनेतील एखादे, तत्त्व अमान्य असणाऱ्या व्यक्तीला किंवा पक्षाला निवडणूक लढविण्याचा अधिकार नाही.
 खोटे न बोलणारांना नाही
 शेतकरी संघटनेचा प्रभाव असलेला एखादा पक्ष आहे असे समजा; तो 'स्वतंत्र भारत' असो वा आणखी कोणता; पण निवडणुकीचा अर्ज भरायचा तर ज्या शपथेवर सही करायची त्यातील शब्द आपल्याला मान्य आहेत का? मी

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १०७