पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१०८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निर्धार्मिक आहे, मान्य आहे. मी लोकशाहीवादी आहे, मान्य; पण मी समाजवादी आहे असं म्हणून सही करायची म्हणजे शेतकरी संघटनेच्या कोणाही कार्यकर्त्याला किंवा संघटनेची वैचारिक बैठक मान्य असलेल्या कोणाही उमेदवाराला प्रश्न पडेल. समाजवाद्यांना निवडणूक लढविण्यास परवानगी आहे पण ज्या लोकांची समाजवादावर श्रद्धा नाही त्यांना या तथाकथित लोकशाहीवादी देशात निवडणूक लढविण्याचा अधिकार नाही. रशियामध्ये स्टॅलिनच्या काळामध्येसुद्धा समाजवादी नसलेल्यांना निवडणूक लढविण्याची परवानगी होती; पण पी. व्ही. नरसिंहराव, राजीव गांधी, इंदिरा गांधी यांच्या लोकशाहीवादी हिंदुस्थानात समाजवादी नसलेल्यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार नाही. याला काय अर्थ आहे?
 लढाई हक्कासाठी
 मग आपल्यासमोर दोनच पर्याय राहतात. पहिला, राम जेठमलानींनीसुद्धा सुचविलेला, पर्याय म्हणजे सगळे 'नाटक' करतात तसंच आपणही करायचं. ते म्हणतात, 'कशाला वाद घालता, म्हणून टाका समाजवादी आहोत म्हणून, सही करा आणि चिन्ह मिळवा.' दुसरा पर्याय असा की, ठामपणे सांगून टाकायचे की आम्ही खोटं बोलायला तयार नाही, खोटं बोलून आम्हाला निवडणूक लढवायची नाही. आम्ही पहिल्यांदा निवडणूक लढविण्याचा हक्क मिळविणार आहोत; समाजवादी नसलो म्हणून काय झालं? मुस्लिम लीग, जमाते इस्लामपासून विश्वहिंदू परिषदेपर्यंत सर्वजण 'आम्ही निर्धार्मिक आहोत' म्हणून खोटं बोलून सह्या करीत असले आणि निवडणुका लढवीत असले तरी आम्ही खोटं बोलायला तयार नाही. निवडणूक लढविण्यापेक्षा, समाजवादी नसलेल्यांना निवडणूक लढविण्याचा हक्क मिळविण्याचा लढा खुल्या बाजारपेठेचं आंदोलन पुढे नेण्याकरिता जास्त उपयुक्त आहे.
 खुल्या बाजारपेठेसाठी
 शेतकरी संघटनेच्या औरंगाबाद अधिवेशनात परिस्थितीचा आढावा घेतांना आपण पाहिलं की सर्व राजकीय पुढारी खुल्या अर्थव्यवस्थेच्या विरुद्ध आहेत; नोकरदार खुल्या व्यवस्थेच्या विरुद्ध आहेत; सरकारी संरक्षणाशिवाय स्पर्धेमध्ये टिकणं शक्य नाही म्हणून कारखानदारसुद्धा खुल्या व्यवस्थेच्या विरोधात आहेत. खुल्या व्यवस्थेच्या विरोधात सगळे बँकवाले संप करतात, नोकरदार संपावर जातात. या घटकांकडून सरकारवर इतका दबाव आणला जातो की दावोसच्या भाषणात आणि दिल्लीच्या काँग्रेस समितीच्या भाषणात खुद्द पंतप्रधानांनी म्हटलं की, 'खुली व्यवस्था मागणारं या हिंदुस्थानात कुणीच नाही.' म्हणजे जणू, खुली व्यवस्था नको, नियोजन हवं, मदत हवी, संरक्षण हवं अशा प्रकारे 'आम्हाला

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १०८