पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१००

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हटलं की ४२ मध्ये जशी परिस्थिती होती तशीच परिस्थिती आज तयार झाली आहे. सरकार नावाची गोष्ट काही शिल्लक राहिलेली नाही. मुंबईमध्ये दिवसाढवळ्या गुंड लोक राजरासपणे दारूगोळ्याची वाहतूक करीत आहेत, त्यांना पकडायला कोणी तयार नाहीत. आजच्या नागपूर टाइम्समध्ये पहिल्या पानावर, मुंबईमधल्या एका मोठ्या माणसाची मुलाखत आहे. त्यात तो म्हणतो, "दाऊद इब्राहीम हा माझा मानलेला मुलगा आहे हे मी कबूल करतो." कित्येकजण म्हणतात की आम्ही दाऊद इब्राहीमच्या फार जवळीची माणसं आहोत. त्यांना पकडायला कोणी एक पोलिस गेलेला नाही. दाऊद इब्राहिमला जे स्वतः इस्रायलला जाऊन भेटले त्या शरद पवारांचा वाढदिवस काल नागपूरच्या स्टेडियमवर मोठ्या उत्साहाने साजरा झाला, दाऊद इब्राहीमचे साथीदार म्हणून त्यांना पकडायला कोणी स्टेडियमवर गेलं नाही.
 पोलिस आता इथं हजर आहेत. आपल्या सगळ्यांवर कदाचित खटला भरणार आहेत, माझ्यावर भरणार आहेत. औरंगाबादचं भाषण झाल्याबरोबर औरंगाबादच्या पोलिसांनी पहिल्यांदा काय पराक्रम केला, तर माझ्यावर खटला भरला. आज कशाबद्दल खटला भरला जाईल? इथं गावामध्ये भात पिकतो. तो भात पिकल्यानंतर बाजारात जाऊन विकावा लागतो आणि घरी खायच्यापुरता भात सडायचा झाला तर एकतर मायबहिणींना घरी भात सडावा लागतो किंवा शेजारच्या गावी लांब चालत, डोक्यावर भाताचं बोचकं घेऊन जाऊन सडून आणावं लागते, तेव्हा तो आमच्या पोटात जातो. भात गावातल्या गावात सडण्याची सगळ्यांची सोय पाहिजे असेल तर गावामध्ये एक हलर असायला काही हरकत आहे का? पण कायदा म्हणतो की त्याला परवानगी मिळणार नाही. आपल्या शेतात तयार झालेला भात गावातल्या गावात सडून मिळण्याची सोय करायला कायद्याची परवानगी नाही. का म्हणून परवानगी मिळणार नाही? इथे आपले सगळे जे पोलिसभाऊ आहेत त्यांनासुद्धा मी हा प्रश्न विचारतो. त्यांना माहीत आहे, भाताच्या गिरणीला का परवाना मिळत नाही, जर का तिथं जाऊन योग्य त्या अधिकाऱ्याला पाचदहा हजार रुपये लाच दिली तर महिन्या दोन महिन्यांत हलरचं लायसेन्स मिळतं आणि हे लायसेन्स प्रामुख्याने कोणाला दिलं जातं? राज्यकर्त्या पक्षाच्या लोकांना दिलं जातं, पैसे घेऊन दिलं जातं आणि राज्यकर्त्यांचा व नोकरदारांचा स्वार्थ चालत राहावा म्हणून आमच्या मायबहिणींना डोक्यावर भाताची बाचकी घेऊन लांबलांब जाऊन भात सडून आणावा लागतो.
 माझ्या शेतात पिकणारा भात. तो कुठं सडायचा, कुठं विकायचा हे कोणी ठरवायचं? मला वाटलं तर माझ्या घरी उखळामध्ये मी स्वतः सडेन, गावात

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १००