पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/९९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याला लायसेन्स लागतं, माझ्या शेतात पिकवलेला ऊस हा जवळच्या कारखान्यातच घातला पाहिजे, लांब कुठं नेता कामा नये असा कायदा आहे." अर्थमंत्री मला म्हणाले, "ही गोष्ट खरी आहे?" मी म्हटलं, "खरी आहे, तुम्हाला माहीत नाही?" ते म्हणाले, "हा कोणाचा कायदा आहे. राज्य सरकाचा का केंद्र सरकारचा?" मी म्हटलं, "मला वाटतं हा केंद्र शासनाचा कायदा असावा. कारण भाताची गिरणी उघडायला परवाना कशाकरिता लागतो? भातावरची लेव्ही वसूल करता यावी म्हणून. कोणाकोणाकडून लेव्ही वसूल करायची आहे हे परवान्यामुळे माहीत होतं." मला अर्थमंत्री म्हणाले, "असा जर कायदा असेल तर तो कायदा महामूर्ख (Stupid) आहे."
 ज्यांना माझ्यावर आणि या सगळ्या लोकांवर खटला भरायचा आहे त्यांना माझं हे भाषण कोर्टात सादर करावं लागेल. त्यांनी दिल्लीचे वित्तमंत्री डॉ. मनमोहनसिंग यांचं हे वाक्य पुराव्यामध्ये सादर केलं पाहिजे. त्यांच्या मते हा कायदा महामूर्ख आहे.
 त्यावेळी मी त्यांना म्हटलं की, "हा महामूर्ख कायदा तोडण्याचं काम कोणाला तरी केलं पाहिजे. ते काम करायला मी चाललो आहे."
 येथे जमलेल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. वाकर्ला गावामध्ये मी दुसऱ्यांदा येतो आहे. चिमूरमध्ये १९४२ मध्ये जे कांड घडलं त्यात वाकर्ला गावाचा मोठा भाग आहे. गेल्या वेळी लक्ष्मीमुक्तीच्या कार्यक्रमाकरिता कार्यकर्त्यांनी किती प्रेमाने मला ओढून आणलं ते मला आठवतं आहे. त्यानंतर औरंगाबादच्या अधिवेशनाच्या तयारीकरता येथून जवळच शंकरपूरला आलो होतो. तेव्हाही इथली बरीच मंडळी हजर होती हे मला आठवत आहे. औरंगाबादच्या अधिवेशनाच्या आलेले ओळखीचे चेहरे मला इथं दिसत आहेत आणि याच गावामध्ये आणखी एकदा इतिहास घडावा ही मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. १९४२ च्या आंदोलनामध्ये चिमूर प्रकरण झालं आणि त्या चिमूरच्या सगळ्या सत्याग्रहींना. ज्यांच्या गळ्याभोवती फासाचा दोर आलेला, तितक्यात केवळ स्वातंत्र्य आलं म्हणून जीवदान मिळून त्यांचा फासाचा दोर वाचला. त्या सगळ्या क्रांतिवीरांचं कौतुक करण्याकरिता खुद्द पंतप्रधान, ५१ वर्षांनी का होईना इथे आले आणि पंतप्रधानांच्या अर्थमंत्र्यांना हे माहीत नाही की गोऱ्या इंग्रजाची गुलामगिरी संपली; पण त्यांच्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली काळ्या इंग्रजाची गुलामगिरी अजूनसुद्धा चालू आहे.
 नवीन क्रांतीचा इतिहास इथून वाकर्ल्यातून घडायला सुरुवात होत आहे.
 ४२ मध्ये चिमूरला क्रांती झाली, आज इथे१९९३ मध्ये म्हणजे बरोबर ५१ वर्षांनी वाकर्ल्यामध्ये क्रांती घडते आहे. औरंगाबादच्या अधिवेशनात मी असं

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ९९