पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/99

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


असायचा; पण मतलबीपणा मात्र कधी त्याला शिवला नाही. अरुण नरकेंसारखी सभ्य, सुसंस्कृत माणसं राजकारणात कशी? अशी विचारणा करणारा सुनील साच्या कोल्हापूरकरांचं प्रतिनिधित्व करून जायचा. कोल्हापूर आकाशवाणीच्या नीता गद्रेचा ‘अथांग' कथासंग्रह वाचून त्यांना पत्र लिहिणारा सुनील मराठी साहित्याचा चोखंदळ वाचक होता, हे कळायला वेळ लागत नाही. अलीकडेच सुनीलनं मला लिहिलेलं पत्र बहुधा ते त्याचं शेवटचं पत्र असावं. ‘खाली जमीन, वर आकाश'च्या एका भागात मी त्याचा उल्लेख केलेला. वाचकांचे अनेक फोन त्याला जातात. खुलून आलेला तो सुनील पत्रात प्रतिबिंबित होता. अध्र्या हळकुंडानं पिवळा व्हावा असा तो चिल्लर नव्हताच मुळी. त्याला आत्मभान होतं, हे पत्रातून जाणवत राहिलेलं. तो कुशल पत्रलेखक होता. त्या पत्रावर चुकून त्याची सही राहिलेली. मी वेड्यासारखा त्याच्याकडे जाऊन करून घेतली. ऑटोग्राफ घ्यावा तशी. तो माझा विद्यार्थी होता. लौकिक अर्थांनी आता तोच माझा अलौकिक शिक्षक झाला आहे. मी सही घेतली एका अर्थानं बरं झालं, अन्यथा त्या संग्राह्य पत्राची काय पत्रास राहणार होती? ते पत्र त्यानं माझ्याशी केलेला शेवटचा आत्मसंवाद. आता तोच माझा अमोल ठेवा झालाय. तो गेल्यापासूनच्या गेल्या तीन दिवसांत तीसेकदा तरी मी ते पत्र वाचलं. ते त्यानं आपल्या मित्रमंडळात सामूहिक वाचलं होतं, असं स्मशानभूमीत मला कळलं तेव्हा त्याच्या संवेदनशीलपणाची नवी जाण आली.

 सुनीलची नि माझी शेवटची भेट कोल्हापूर आकाशवाणीमधली. तो सपत्निक नटून रेकॉर्डिंगला आलेला. ग्रीष्मातली फुलं त्यानं मला नि श्रोत्यांना रणरणत्या उन्हात फुलवून दाखविली. त्याचं ते शेवटचं भाषण फुलून आलेलं ऐकलं. ते परत ऐकायला हवं. सुनीलच्या व्यक्तिमत्त्वात गगनजाईची शुभ्रता, उच्चभ्रूपणा, सुगंध, हिरवाई सारी उत्तुंगता सामावलेली होती. अशी निष्कपट ऋजुता या मातीत परत रुजणे नाही. सुनीलच्या जाण्यानं मला दु:ख वाटण्याचं कारण इतकंच! त्याचं जीवन एक करुण गाणं होतं!

माझे सांगाती/९८