पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अरविंद सिंहना ते खूप आवडलं होतं. अगदी ताजं होर्डिंग ‘कोल्हापूर नगरी खास, इथं भरपूर डास!' स्थळ, काळ, वेळ यांचे सुनीलचं त्रैराशिक वाखाणण्यासारखं होतं.
 त्याने ‘आसमा' स्थापन केली. परस्पर' हा काव्यरसिकांचा ग्रुप चालविला... हेल्पर्स, बालकल्याण संकुलाची नेहमीची कल्पक, समाजहितवर्धक निमंत्रणं... हा त्यांचाच आविष्कार नि निर्मिती असायची. सामाजिक संस्थांबद्दल त्याच्या मनात एक उमदी उदारता असायची. या संस्थांची कामं तो तत्परतेनं, आत्मीयतेनं करायचा. बिलं मागायला मात्र कधी तो गेला नाही. अगदी निकडीच्या काळातही त्याचा मोकळा हात असायचा. तसं त्याचं मनही!
 सुनील हळवा असायचा. केवळ मनसोक्त, दाबलेलं रडं ओकण्यासाठी तो अनेकदा हक्कानं माझ्याकडे यायचा. काही बोलायचा नाही, सांगायचा नाही, हमसून रडायचा नि उठून जायचा. मला विचारायचं धाडस व्हायचं नाही; कारण रडण्यामागील सारी अरिष्टं मला अगोदरच माहीत असायची.
 मी बालकल्याण संकुल सोडलं तेव्हा तोच माझ्यापेक्षा अस्वस्थ, बैचेन होता. विश्वस्तांकडे जाऊन भांडला, माझ्याकडे आला, 'तुम्ही काही करणार असाल तर मला गृहीत धरा' म्हणाला. आपणाला गृहीत धरता यावीत अशी किती माणसं जीवनाच्या प्रवासात भेटतात? गृहीतं खोटी ठरणारीच अधिक नां!
 नित्य-नव्या कल्पना, मुशाफिरीत रमणारा सुनील, व्यवसायात रोज नवीन प्रयोग करीत राहायचा. आसमा, इव्हेंटनंतर त्याला ई मीडिया खुणवत होता. काही वर्षांपूर्वी ‘टाइम्स ऑफ इंडिया'त त्याची जाहिरात झळकल्यानंतर हरकून गेलेला सुनील मी विसरू शकत नाही.
 अनेक प्रशिक्षण कार्यक्रमांत तो व्याख्याने द्यायचा. दोन वर्षांपूर्वी प्राध्यापकांच्या प्रशिक्षण वर्गात त्यानं ‘मीडियावर केलेलं व्याख्यान मोठं आश्वासक होतं नि आत्मविश्वासपूर्णही! व्याख्यानात चिमटेही असायचे. जयेंद्रचा त्यानं साजरा केलेला सुवर्णमहोत्सव त्याच्या परिश्रमी योजकतेचा आरसाच होता. घाटगे-पाटील, पेरिना, वारणाच्या त्याच्या जाहिराती लक्षवेधी ठरल्या. जाहिरातींची त्याची कॉपी (मजकूर) त्याच्या सर्जनशील मनाचा कवडसा असायची. मोठा संयमी होता तो. दस-याला दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षणाचा पर्याय स्वीकारणारा तो मनानं खरा पोक्त, प्रौढ होता.

 रवींद्र उबेरॉयनी मध्यंतरी ज्ञानेश सोनारांचा कार्यक्रम योजलेला. सुनीलला भावला. त्यानं मन:पूर्वक अभिनंदन पत्र लिहिलं. त्याच्या पत्रात मतलब (अर्थ)

माझे सांगाती/९७