पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संवेदनशील विद्यार्थी : सुनील धोपेश्वरकर

 दिनांक २३ जून, सकाळ! सकाळ कधी-कधी काळरात्र बनून येते खरी. त्या दिवशी सुनील धोपेश्वरकरांसाठी तरी सकाळ काळरात्र म्हणून नांदत होती. दक्षिणायन सुरू झालं की रात्र मोठी होऊ लागते म्हणे. ती इतकी मोठी व्हावी की काळरात्र ठरली? जगाचा भूगोल नि मनाचा इतिहास यांचा कधी मेळच लागत नाही. पुण्यनगरीचा रस्ता सुनीलसाठी तरी । अपघाती सावज शोधणारा ठरला. सुनील संवेदनशील असल्यानं अशाच माणसांशी त्याचं पटायचं. मला राजेंद्र पारिजातांचा फोन. त्यानंतर जयसिंग पाटलांचा, विश्वास पाटील, डॉ. सुभाष देसाई, डॉ. सुनील पाटील, माधव पंडित... एकापेक्षा एक संवेदनशील माणसं एकमेकाला सुनील गेल्याचा शोक समाचार कळवित राहिली. त्या सर्वांमागे सुनील जाण्याचा अनपेक्षित धक्का होता. सुनीलला बसलेल्या अपघाती धक्क्याइतकाच तो साच्या जिवंत माणसांनीही अनुभवला.

 दुपारी सुनीलच्या 'पैस' या राहत्या घरावर अपार गर्दी. मी हार घेऊन पोहोचतो; पण हार घालण्याचे धाडस काही झालं नाही. त्याचं मरण मी अद्याप कबूल केलेलं नाही. गर्दीत सर्व क्षेत्रांतील निवडक संवेदनशीलच उपस्थित होते. कोल्हापुरातील संवेदनशील माणसांचा माझा सव्र्हे त्या दिवशीच पूर्ण झाला. जाहिरातदार, पत्रकार, व्यावसायिक बांधीलकी म्हणून उपस्थित नसल्याचं त्यादिवशी प्रकर्षाने जाणवलं! सर्वांची उपस्थिती माणुसकीची प्रचिती देणारी होती असं फार कमी वेळा घडतं.

माझे सांगाती/९३